भाजपला पाठिंबा म्हणजे मृत्यूला आमंत्रण, राष्ट्रवादी काँग्रेसचे टिकास्त्र

भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांचा पुत्र व भाजप उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील कारने एका दुचाकीला धडक दिली. या धड़केत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर करण भूषण सिंह यांनी जखमींना मदत करण्याऐवजी तेथून पळ काढला. त्यामुळे सध्या त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसने देखील एक व्हिडीओ शेअर करत भाजपवर सडकून टीका केली आहे. ”पुणे ते उत्तरप्रदेश अशा सगळ्याच ठिकाणी हिट अँड रन प्रकरण होत आहेत. परंतु याला जबाबदार असणा-या भाजप नेत्यांमध्ये, श्रीमंतांच्या मुलांमध्ये सत्तेचा, पॉवरचा हा उन्माद नेमका येतो तरी कुठून ? भाजपला समर्थन म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे हे जनतेने लक्षात ठेवावं”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाने देशभरात खळबळ माजवलेली असताना आता उत्तर प्रदेशमध्ये भाजप उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील गाडीने दोघांचा जीव घेतला आहे. करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील फॉर्च्युनर कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातानंतर करण भूषण सिंह यांनी घटनास्थळावर त्या तरुणांना मदत न करता तेथून पळ काढला. करण भूषण सिंह हे भाजपचे माजी खासदार व देशातील कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केलेले बृजभूषण सिंह यांचे पुत्र आहेत.