अजून किती घोटोळे? रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादीने राज्य सरकारला फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

राष्ट्रवादी काँग्रेसने रोजगार हमी योजनेवरून राज्य सरकारला फटकारले आहे. रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचारात वाढ झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राष्ट्रवादीने ट्विटरवर पोस्ट शेअर करत मिंधे सरकारवर निशाणा साधला.

”रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचारात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात वर्षाला 3 लाखांपेक्षा अधिक कामे, कामांवर 35 लाख अकुशल मजुरांना किमान 100 दिवसांच्या रोजगाराची हमी देणाऱ्या ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ व ‘राज्य रोहयो’ मध्ये वर्ष 2022-23 मध्ये 1 कोटी 73 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला असून 9 कोटी 82 लाख रुपयांची आर्थिक अनियमितता आढळून आली आहे. कॅगच्या अहवालात याबाबत ठपका ठेवण्यात आला आहे. या योजनेमध्ये आर्थिक अनियमितता आणि प्रक्रिया उल्लंघनाचे प्रमाण मोठे होते. योजनेतील आर्थिक अनियमितता घटली असली तर भ्रष्टाचार मात्र वाढत गेला आहे. बनावट देयके करून कोषागारातून अपहार करणे, मूल्यांकनापेक्षा अधिक रक्कम दाखवून रकमा काढणे, मस्टरमधील मजूर आणि प्रत्यक्षातील व्यक्ती वेगळ्या असणे तसेच कनिष्ट अभियंते व कृषी सहाय्यक यांनी संगनमत करून अपहार करणे आदी तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. तरी राज्य सरकारचे डोळे कधी उघडणार हाच प्रश्न इथे उपस्थितीत होतो. अजून किती घोटोळे किती भ्रष्टाचार ? सरकारने कुशल मजुरांना योजनेचा लाभ देऊन ज्या आधी तक्रारी दाखल झाल्या आहेत त्यावर दखल द्यावी व योग्य ते पाऊल उचलावे”, ”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.