राज्यभरात असे बनावट मतदार किती असतील? रोहित पवार यांचा सवाल

लोकसभा निवडणुकीत कशी मतांची चोरी झाली याचे पुरावे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले होते. महाराष्ट्रातही निवडणूक आयोगाचे एक झोल समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी एक बनावट मतदार समोर आणला आहे. तसेच राज्यभरात असे किती बनावट मतदार असतील? असा सवाल विचारला आहे.

एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, मतदार यादीत बोगस नावं कशाप्रकारे घुसवली जातात याचं सविस्तर प्रेझेंटेशन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कालच केलं. राज्यात याचा नमुना बघायचा असेल तर शिरुर विधानसभा मतदारसंघातील काही संशयित मतदारांची शहानिशा करण्याची मागणी उमेदवार अशोक बापू पवार यांनी निवडणूक आयोगाकडं केली होती, परंतु सदर मतदार दिलेल्या पत्त्यावर रहात नसल्याचं निवडणूक आयोगाने मान्य केलं, मात्र त्याची नोंद कशी झाली? याबाबत हात झटकले आणि याचं खापर ऑनलाईन मतदार नोंदणी प्रक्रियेवर फोडलं असे रोहित पवार म्हणाले.

तसेच धन्य तो निवडणूक आयोग आणि धन्य ती मतदार नोंदणी प्रक्रिया! एक बरं झालं, संबंधित मतदार दिलेल्या पत्त्यावर रहात नसल्याचं तरी निवडणूक आयोगाने मान्य केलं.. पण राज्यभरात असे बनावट मतदार किती असतील, याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.