
सरकारने दिवाळीच्या तोंडावर घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढविले. आता गोरगरिबांनी त्यांच्या पोरांना मोबाईलवर फराळाचे फोटो दाखवायचे का? नुसते मेळावे घेऊन महागाई कमी होणार आहे का, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. दौंड तालुक्याच्या पश्चिम व जिरायत पट्ट्यातील गावांमध्ये सुप्रिया सुळे यांनी दौरा केला.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कारभाराविरोधात जोरदार टीका केली. सर्वसामान्य नागरिक महागाई व बेरोजगारीने त्रासला असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी भलत्याच गोष्टींमध्ये सरकार गुंतले आहे. मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडीच्या सरकारने चांगले काम केले होते. आता सरकार गेले याचे दु:ख नाही. मात्र खोके घेऊन जे गेले त्याचे दु:ख आहे. सर्वसामान्य जनतेसाठी नाही तर स्वत:च्या स्वार्थासाठी हे गेले आहेत. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे देश अडचणीत येण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.






























































