
सामना प्रतिनिधी । सोलापूर
जिल्ह्याच्या दुष्काळी आढावा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर गाजरे फेकण्यासह मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी होटगी रोडवर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे पोलिसांची पुरती धांदल उडाली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री बुधवारी सोलापूर दौऱयावर होते. सकाळी 10 वाजता दुष्काळी आढावा बैठक, 12 वाजता महापालिकेच्या विकासकामांविषयी बैठक त्यानंतर 1 वाजता कायदा व सुव्यवस्थेची आढावा बैठक घेऊन मुख्यमंत्री मुंबईला रवाना झाले होते.
दसऱ्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार : मुख्यमंत्री
दसऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मात्र या विस्तारात कोणाला घेणार, कोणाला वगळणार याबाबतचा तपशील त्यांनी दिला नाही. तसेच एकनाथ खडसे यांना पुन्हा घेणार का याबाबत काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.

























































