NCPA

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नमिता वारणकर,[email protected]

NCPA जुन्या नव्या कलावंतांचे हक्काचे व्यासपीठ 50शीत प्रवेश करीत आहे..

मुंबईतील एनसीपीए… म्हणजेच ‘नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस… संगीत, नृत्य, नाटक, चित्रपट, साहित्य, छायाचित्रीकरण… अशा अनेक कलांकरिता जगभरातील कलाकारांना मिळालेला रंगमंच… जिथे एकापेक्षा एक सुंदर सुंदर कलाकृतींचा आनंद रसिकांना घेता येतो… अशा या भव्य वास्तूला 50 वर्षे पूर्ण होत आहेत.

आपल्या देशातील सांस्कृतिकता जपण्यासाठी या वास्तूत वर्षभरात 700 हून जास्त कार्यक्रम सादर केले जातात. यावर्षी 5 दशकांच्या पूर्तीनिमित्त अनेक खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याबाबत एनसीपीएचे खुश्रू एन. संतुक यांचं म्हणणं आहे की, देशाला हे भव्य सांस्कृतिक व्यासपीठ प्रदान करण्याचा विचार जे. आर. डी. टाटा आणि डॉ. जमशेद भाभा यांच्या मनात आला. 1969 साली या वास्तूची स्थापना झाली. हा प्रवास आमच्यासाठी अद्भूत आहे. त्यामुळे एवढा मोठा प्रवास पूर्ण केल्याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. यापुढेही सांस्कृतिकतेबरोबर कलेची जोपासना करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. याकरिताच वर्षभर शास्त्रीय, पारंपरिक, आदिवासी, प्रादेशिक असे अनेक कार्यक्रम रसिकांना पाहता येतील.

हिंदुस्थानच्या संस्कृतीबरोबरच एनसीपीएतर्फे परदेशी कलाकारांनाही प्राधान्य दिलं जातं. यासाठी लंडनमधील नॅशनल थिएटर, न्यूयॉर्कमधील मेट्रोपोलिटन ओपेरा यांच्याशीही आम्ही जोडले गेलो आहोत. याबरोबरच सिनेमा, संगीत आणि पुस्तकांचे भांडारच येथे कलाकारांना उपलब्ध करून दिले आहे. मनोरंजन आणि सांस्कृतिकतेचा वारसा यापुढेही जपला जावा, यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोतच, या माध्यमातून डॉ. जमशेद भाभा यांचे स्वप> साकार होत असल्याचा विश्वास ते व्यक्त करतात.

एनसीपीएमध्ये ओडीसी नृत्याचं लहानपणापासूनच गुरु केळुचरण महापात्र यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या ज्येष्ठ ओडीसी नृत्यांगना कलाकार म्हणून एनसीपीएशी असलेल्या नात्याविषयी आपल्या भावना व्यक्त करतात. त्या सांगतात, गुरु केळुचरण महापात्र एनसीपीएमध्ये कार्यशाळा घ्यायचे. पहिली कार्यशाळा 1982 साली झाली. त्यामुळे तिथले सर्वच कर्मचारी, तंत्रज्ञ, पदाधिकारी, साऊंड आर्टिस्ट, स्वयंपाकी या सगळ्यांबरोबर एक मोठं कुटुंब तयार झालं होतं. सगळ्यांकडून आम्हाला काही लागलं तर तत्परतेने मिळायचं. त्यामुळे एनसीपीएशी असलेलं नातं आजही टिकून आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्व कार्यशाळांमध्ये ‘विनामूल्य’ सहभागी होण्याची संधी मिळाली. मला शास्त्रीय नृत्यासाठी मोठय़ा गुरुंची उपलब्धी करून देण्यात एनसीपीएचा मोठा वाटा आहे.

एनसीपीएमध्ये चार वेगवेगळ्या प्रकारचे रंगमंच आहेत. लिटिल थिएटर, गोदरेज थिएटर, एक्सपिरीमेंटल थिएटर, टाटा थिएटर या प्रत्येक ठिकाणाचं वेगवेगळं वैशिष्टय़ आहे. येथे कलाकाराची क्रियाशीलता वाढीस लागते. टाटा थिएटर खूप मोठं आहे. समुहाने कार्यक्रम सादर करण्यासाठी या रंगमंचाचा उपयोग होतो. वरून पाहाणाऱया प्रेक्षकांना रंगमंच कसा सुंदर दिसेल याचा विचार येथे केला जातो, अशी माहिती त्या येथील रंगमंचाच्या वैशिष्टय़ाविषयी देतात.

ncpa-f

वैशिष्टय़पूर्ण नवा लोगो

50 वर्षांच्या प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल एनसीपीएकडून एक नवीन लोगो तयार करण्यात आला आहे. लोगोतील असंख्य रंगांचा अर्थ जे कलाकार त्यांची कला साकार करण्यासाठी स्वतःला अर्पण करतात त्यांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. संगीताच्या भव्यतेसाठी हिरवा, पाश्चात्त्य संगीतासाठी निळा, नृत्य अभ्यासकांसाठी पिवळा तसेच एकंदरीत सर्वच कलांच्या समृद्धीसाठी जांभळा रंग वापरण्यात आला आहे, अशी माहिती खुश्रू एन. संतुक यांनी दिली.

नव्या कलाकारांना वाव

या संस्थेतर्फे वेगवेगळ्या कलांसाठी महोत्सव केले जातात. ‘उमंग सिरीज’, ‘मुद्रा महोत्सव’, ‘नक्षत्र’ अशी काही त्यांची नावे आहेत. उमंग सिरीजमध्ये नवीन कलाकारांना आपली नृत्यकला सादर करण्याची संधी मिळते. याकरिता त्यांना अर्ज करावा लागतो. त्यासोबत सादरीकरणाचा व्हिडियो पाठवावा लागतो. त्यानंतर रंगमंचावर कला सादर करण्याची परवानगी दिली जाते. शिवाय परदेशी कलाकारांना एखादी थिम घेऊन आमंत्रित केलं जातं. ज्युनियर कलाकारांनाही व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं. लोककला सादर करणाऱयांनासुद्धा संधी दिली जाते, शिवाय सभासदत्वही घेता येतं, अशा प्रकारे नव्या कलाकारांना एनसीपीएकडून अधिकाधिक वाव दिला जातो, असे त्यांचे म्हणणे आहे.