
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीप येथील खासदार मोहम्मद फैजल यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. फैजल यांना एका प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना अपात्र करण्यात आल्याची माहिती लोकसभा सचिवालयाकडून शुक्रवारी रात्री देण्यात आली.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान काँग्रेसचे नेते पी.एम. सईद यांचे जावई आणि काँग्रेस नेते मोहम्मद सालेह यांच्यावर हल्ला झाला होता. सालेह यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणात फैजल यांनी मदत केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात लक्षद्वीपमधील कवरत्ती जिल्हा आणि सत्र न्यायालयाने खासदार फैजल यांच्यासह अन्य तीन जणांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच, चारही जणांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई केली जात आहे. या निर्णयाविरोधात केरळ उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, असे मोहम्मद फैजल यांनी म्हटले आहे.



























































