माझ्यासोबत हिंदुस्थानला वर घेऊन चाललेय! शिरीषा बांदला अंतराळात झेपावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोलंबिया यानाने अवकाशात झेपावणाऱया दिवंगत अंतराळवीर कल्पना चावलाने असंख्य तरुणींना अंतराळ सफरीचं स्वप्न दाखवलं. त्यातल्याच एकीचे स्वप्न आज पूर्ण झाले. हिंदुस्थानात जन्मलेल्या शिरीषा बांदला हिने ब्रिटिश उद्योगपती रिचर्ड ब्रेन्सन यांच्या व्हर्जिन गॅलेक्टिक अंतराळ मोहिमेतून अवकाशात झेप घेतली. तमाम हिंदुस्थानींना अभिमान वाटावा आणि इतिहासात सुवर्णाक्षरात लिहावा असा हा क्षण! शिरीषासाठी तर शब्दांत सांगता येणार नाही, असा हा अनुभव. ‘असं वाटतंय, मी सोबत हिंदुस्थानला वर घेऊन चाललेय…’ शिरीषाची ही प्रतिक्रिया म्हणजे एक नवा अध्यायच जणू!!

चार वर्षांची असताना गेली अमेरिकेत

  • आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिह्यातील चिराला येथे 1987 साली शिरीषाचा जन्म झाला. तिचे वडील बी. मुरलीधर आणि आई अनुराधा अमेरिकेत नोकरी करत होते. ते शिरीषाला आजीआजोबांकडे ठेवून अमेरिकेला गेले. शिरीषा चार वर्षांची असताना आईवडिलांच्या ओळखीच्या एका व्यक्तीसोबत अमेरिकेत गेली. शिरीषा अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये राहते. तिच्या घराजवळ नासाचे जॉन्सन स्पेस सेंटर आहे. त्यामुळे लहानपणापासूनच ती अंतराळाशी संबंधित लोकांना बघत होती. याच क्षेत्रात करीयर करायचे तिने ठरवले.

हिंदुस्थानी वेळेनुसार रविवारी सायंकाळी 6 वाजता न्यू मॅक्सिकोच्या वाळवंटातून रिचर्ड ब्रेन्सन व्हर्जिन गॅलेक्टिकच्या ऑपरेशन बेसवरून स्पेसफ्लाइट युनिटी 22मधून अंतराळात झेपावणार होते मात्र खराब हवामानामुळे ते रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी उडाले. तब्बल तासाभराची सफर यशस्वी करून हे स्पेस फ्लाइट बेसवर परतलेही. ब्रेन्सन यांच्यासोबत कंपनीतील पाच सहकारी होते. त्यामध्ये हिंदुस्थानच्या शिरीषाचा समावेश आहे. कल्पना चावलानंतर अवकाशात जाणारी हिंदुस्थानात जन्मलेली ती दुसरी महिला अंतराळवीर ठरली आहे.

17 वर्षांची मेहनत फळाला आली

सुमारे तासाभराची अंतराळ सफर करून परतलेल्या रिचर्ड ब्रेन्सन यांनी रविवारी इतिहासच घडविला. बेसवर सुरक्षित लँडिंग केल्यानंतर त्यांनी गेल्या 17 वर्षांची मेहनत फळाला आली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्वांचे अंतराळात जाण्याचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे आणि त्याची ही सुरुवात होती असे ते म्हणाले.