
रब्बी हंगामासाठी विहिरींमध्ये पाणी आहे, पण रब्बीतील गहू आणि हरभऱ्याच्या वाढीसाठी पूरक वातावरणाची निर्मिती होणे आवश्यक आहे. आकाश निरभ्र झाले पाहिजे. त्याचवेळी वातावरणात गारठा निर्माण झाला पाहिजे. स्वच्छ वातावरण आणि गारठा असेल तरच गव्हाची आणि हरभऱ्याची वाढ जोमदार होऊ शकेल. पावसाळी वातावरण आणि ढग कायम राहिले तर खरिपाप्रमाणेच रब्बीचे नुकसान होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.
जिल्हात मागील तीन वर्षांत पावसाअभावी दुष्काळ होता, पण यंदा जिल्हात 774 मिलिमीटर पाऊस झाला. जिल्हाचे सरासरी पर्जन्यमान 546 मिलिमीटर आहे. सरासरीच्या तुलनेत सुमारे पन्नास टक्के जास्त पाऊस झाला. पावसाचा कालावधी लांबल्याने खरीप हंगामाचे नुकसान झाले. त्यात खरिपातील ज्वारी, बाजरी, मका, कांदा आणि कपाशीचे प्रामुख्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. अखेरच्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील उत्पन्नात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट आली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मात्र जास्तीच्या पावसाने जलस्तर उंचावला. त्यामुळे रब्बी हंगामाबाबत शेतकरी आशावादी झाले. सरासरीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 30 टक्के जास्त क्षेत्रफळात गहू, हरभऱयाची पेरणी झाली. जिह्यात खरिपाचे 75 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र आहे.
साधारणपणे गव्हाची पेरणी होऊन तीन आठवडे ते एक महिना होत आला. गव्हाची वाढदेखील बऱ्यापैकी झाली, मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहते. काही काळ गारठा निर्माण होतो, परंतु बराच काळ दमट वातावरण निर्माण होते. दोन दिवसांपासून तर पावसाचे शिडकावे आणि हलक्याशा सरीदेखील कोसळत आहेत. निर्माण झालेले हे वातावरण गहू आणि हरभऱ्यासाठी पोषक नाही. या वातावरणामुळे गव्हावर तांबेरा तर हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकरी व्यक्त करू लागला आहे. वातावरण काही दिवस टिकून राहिले तर खरिपाप्रमाणेच रब्बी हंगामातील गहू आणि हरभऱयाचे नुकसान होईल. नुकसान टाळण्यासाठी आकाश निरभ्र व्हावे आणि सर्वत्र कडाक्याची थंडी पडावी, जेणेकरून रब्बीतील गहू आणि हरभरा खरिपातील नुकसानभरपाई करू शकेल, अशी अपेक्षा अशोक पाटील या शेतकऱयाने व्यक्त केली.
गोंदूर शिवारातील शेतकरी सुनील पाटील यांनी सांगितले की, कापसाचे नुकसान झाल्यानंतर आता रब्बी हंगामावर संपूर्ण मदार आहे. रब्बीत मका घेण्याचा प्रयत्न आहे, पण निर्माण झालेल्या वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत कुठले उत्पन्न घ्यावे आणि घेऊ नये हे कळे नासे झाले आहे. याचा विचार सर्व शेतकरी आणि सरकारने करण्याची वेळ आली आहे, असेही सुनील पाटील या शेतकऱयाने सांगितले.































































