ब्रिटिशकालीन कायदे बदला! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे परखड मत

1316

स्वातंत्र्य मिळवून बराच काळ झाला असूनही अद्याप ब्रिटिशकालीन कायदे अस्तित्वात आहेत. समाजाच्या गरजेनुसार आणि बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या कायद्यांबाबत सिंहावलोकन करून त्यात बदल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले.

नाशिक येथील न्यायमूर्ती कै. एच. आर. खन्ना सभागृहात महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेतर्फे आयोजित वकील परिषद 2020 अंतर्गत ‘जलद व आधुनिक न्यायदानाच्या दिशेने’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ब्रिटिशकालीन कायद्यात सुधारणा व्हायला हवी, पण ती करणार कोण, कोणाची हिंमत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या आधीचे ब्रिटिश कायदे आजही आहेत, आपण ते राबवतोही. आधुनिकतेकडे जाताना जलदगतीने जायला हवे. आजच्या घडीला कोणता कायदा आवश्यक आहे, कोणता कायदा अनावश्यक आहे, त्याच्यात सुधारणा वा व्हायला पाहिजे, याचे सिंहावलोकन व्हायला हवे. यासाठी पूर्ण देशातल्या मुख्यमंत्र्यांना बोलवा, न्यायमूर्ती, ज्येष्ठ न्यायाधीश, कायदेतज्ञ आणि आणखी संबंधितांना एकत्र बोलावून चर्चा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

महापुरुषांना अभिप्रेत महाराष्ट्र घडविण्याची ताकद न्यायव्यवस्थेत

ऍडव्हाेकेट वेल्फेअर ट्रस्टच्या मागणीबाबत आणि वकील भवनाबाबत प्रस्ताव सादर केल्यास त्यासाठी सहकार्य करण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दर्शविली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडविण्याची ताकद न्यायव्यवस्थेत आहे, तिचा योग्य उपयोग व्हावा, असेही ते म्हणाले.

चर्चासत्राआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत व न्यायमूर्ती गवई यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. इमारत तीन वर्षांत पूर्ण होईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमाला सर्वेच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई, परिवहनमंत्री अनिल परब, नाशिकच्या पालक न्यायमुर्ती अनुजा प्रभुदेसाई, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मकरंद कर्णिक, न्यायाधीश संदिप शिंदे, देशाचे अतिरिक्त महाधिवक्ता ए. एन. एस. नाडकर्णी, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील शेखर नाफडे आदी उपस्थित होते.

निर्भयाच्या आरोपींना फासावर लटकवले नाही, जलदगतीचे काय झाले?

जलद आणि आधुनिक न्यायव्यवस्था हा महत्त्वाचा विषय आहे. जनतेच्या मनातील ही भावना आहे, ती ओळखल्याबद्दल आयोजकांना त्यांनी धन्यवाद दिले. एखाद्या घटनेत जलदगतीने न्याय देऊ, असं आम्ही म्हटलं, तर तो न्यायालयाचा अवमान होत नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दिल्लीतील निर्भया अत्याचार प्रकरणाने संपूर्ण देशात आक्रोश माजला होता. हा खटला जलदगतीने चालला की नाही, हे माहित नाही, पण या खटल्यातील आरोपींना शिक्षा सुनावल्यानंतरही त्यांना फासावर लटकविले गेले नाही, मग जलदगतीचे काय झाले, असा परखड सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

न्यायमूर्ती घडविणारे पहिले विद्यापीठ महाराष्ट्रात

जिल्हा न्यायालयाची इमारत उभारण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. न्यायमूर्ती घडविणारे पहिले विद्यापीठ महाराष्ट्रात उभे करण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली. चांगल्या न्यायमूर्तींच्या परंपरा पुढे नेणारे न्यायमूर्ती तयार व्हावेत आणि रामशास्त्री प्रभुणे यांच्यासारख्या राजालाही त्याच्या चुकांची जाणीव करून देणारा न्यायाधीश अशा विद्यापीठातून घडावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वकीलपत्र घ्या, पण गुन्हेगाराला निर्देष ठरविण्याचा आटापिटा नको!

खटल्यांचा निपटारा होत नाही, गुन्हेगारी थांबत नाही, यामुळे भविष्यात ही इमारतही कमी पडेल. गुन्हेच घडणार नाहीत, हे आपण करू शकतो का, याचा विचार व्हायला हवा. संस्कारक्षम, आदर्श समाज घडायला हवा, असे सांगून ते म्हणाले की, ज्याने गुन्हा केला आहे, जो चुकीचा आहे, त्याचे वकीलपत्र जरूर घ्या, पण त्याला निर्दोष करण्यासाठी आटापिटा करू नका. गुन्हेगाराला जर कळाले की, आपली बाजू घेणारे कोणी नाही, दोषी असेल तर शिक्षा होणारच, असे झाले तरच गुन्हेगारांना वचक बसेल आणि गुन्हे कमी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देशात कायदाच नाही हे न्यायालय म्हणत असेल तर सर्वसामान्यांनी काय करायचं?

‘काय करायचं, या देशात कायदाच नाही’, असं जर सुप्रिम कोर्ट हताशपणे म्हणत असेल तर सर्वसामान्य जनतेने काय करायचं? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिण्याचे काम केले, दिशा दाखविली, त्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला सुधारणा करण्याची गरज असेल तर ती प्रत्यक्षात आणलीच पाहिजे. लोकशाहीचे चार स्तंभ एकमेकावर कुरघोडी करताहेत, तसे न करता या चार स्तंभांनी एकत्र आलं पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या