संचित : गद्य लता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दिलीप जोशी

अनेक वर्षे ‘आकाशवाणी मुंबई’ श्रोत्यांच्या मनावर गारुड करणारा स्वर म्हणजे नीलम प्रभू ऊर्फ करुणा देव.

नीलम प्रभू ऊर्फ करुणा देव गेल्यानंतर त्यांच्यावरच्या लेखाचं शीर्षक हेच दिलं होतं. ते माझं नव्हे. एका कार्यक्रमात अभिनेता यशवंत दत्त याने नीलमताईंच्या प्रभावी प्रत्ययकारी गद्य आणि हृद्य सादरीकरणाचा असा उल्लेख केला होता. हा स्वर अनेक वर्षे ‘आकाशवाणी मुंबई’ श्रोत्यांच्या मनावर गारुड करत होता. जयवंत दळवी यांच्या ‘महानंदा’ कादंबरीचं नीलमताईंनी आकाशवाणीवरून केलेलं अभिवाचन आता त्यांच्या संग्रही आहे की नाही ठाऊक नाही, पण आम्ही अनेक जणांनी रेडिओला कान देऊन ते ऐकलं होतं. बाळ कुरतडकर यांच्या साथीने असे अनेक कार्यक्रम रंगायचे. त्यातला खूपच प्रसिद्ध झालेला ‘पुन्हा प्रपंच’ हा कार्यक्रम नीलम प्रभू (मीना), कुरतडकर (पंत) आणि प्रभाकर जोशी (टेकाडे भावोजी) यांनी अनेक घरांत नात्यातल्या माणसांचं स्थान मिळवलं होतं, ते केवळ आवाजाच्या किमयेने. ‘पंतां’ची ‘‘मीने।़ मीने।़ मीने।़ मीने।़ मीने।़।़’’ अशी लांबलचक हाक ऐकली की, नीलमताई ‘‘आले।़ आले।़ आले।़ आले।़ आले।़।़’’ असं म्हणत. ते श्रोत्यांना पाठ झालेलं होतं.

मी पहिल्यांदा दादरच्या त्यांच्या घरी गेलो ते त्यांचे पती बबन प्रभू यांना भेटायला. बेल वाजवल्यावर ‘‘आले।़ आले।़’’ असा परिचित स्वर कानी पडला. दार उघडलं तर नीलमताई काठीवरचा धुतलेल्या कपडय़ाचा पिळा घेऊन गृहिणीच्या थाटात उभ्या! ‘‘मी दिली…’’ ‘‘हो, हो या ना… तुम्ही मगाशी पह्न केला होता ना?… अरे बब।़।़न ते जोशी आलेत बघ.’’ मग आकाशवाणीवरच्या त्या प्रसिद्ध स्वराशी नेहमीच गप्पा होऊ लागल्या. बबनचा ‘मूड’ सांभाळून त्याचं सारं निगुतीने करणाऱया नीलमताई घरचं सगळं आटपून ट्रेनने आकाशवाणीवर जात असत. कधीतरी दादर स्टेशनच्या पुलावरही भेटत. ही सगळीच माणसं खूप मोठी आणि साधी.

आकाशवाणीवरच्या ‘‘पुन्हा ‘प्रपंच’चं रेकॉर्डिंग आहे का?’’ अशी विचारणा निवेदक-मित्र श्रीराम केळकरकडे केली. तेव्हा त्याने नीलमताईंच्या आवाजातलं, नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे ‘आम्ही तिघी’ हे नभोनाटय़ मात्र असल्याचं सांगितलं.

त्यांच्या आवाजाचं हे नैपुण्य मला वारंवार अनुभवता आलं ते त्यांच्याशी झालेल्या गप्पा गोष्टींमधून. एकदा त्या म्हणाल्या, ‘‘आज दुपारी ‘वनिता समाजा’त आम्ही ‘प्रपंच’ सादर करणार आहोत. नक्की या.’’ त्या वेळी स्टेजवर नीलम प्रभू, बाळ कुरतडकर आणि प्रभाकर जोशी यांचा ‘पुन्हा प्रपंच’ प्रत्यक्ष पाहिला… ऐकला!

गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे बबन आणि नीलम प्रभू आमच्या राजावाडी गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला आले होते. तेव्हा प्रेक्षकांनी आग्रह केल्यामुळे त्यांनी आकाशवाणीवर कसं बोललं तरच ते श्रोत्यांपर्यंत प्रत्ययकारी पद्धतीने पोहोचतं याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. ‘रामाने आंबा खाल्ला’ या वाक्याचे प्रत्येक शब्दावर जोर देऊन केलेले तीन वेगळे ध्वनितार्थ त्यांनी सांगितले. आंबा ‘रामाने’ खाल्ला असेल एवढंच ध्वनित करायचं त्या शब्दावर जोर, आंबाच खाल्ला ही ध्वनित करायचं तर तो शब्द जोरात उच्चारणे यातून ते समजून आलं. समोरचे श्रोते दिसत नसताना त्यांच्याशी ‘संवाद’ साधताना याचं भान आकाशवाणी कलाकारांना ठेवावं लागतं असं त्यांनी सांगितलं. त्यांचं एक महत्त्वाचं व्हिडीओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे आणि ‘यूटय़ूब’वर पाहता येतं ते म्हणजे पुल देशपांडे यांच्या ‘वाऱयावरची वरात’ कार्यक्रमात. त्यातली ‘एका रविवारची कहाणी’मध्ये पुलंच्या पत्नीची भूमिका करणाऱया नीलमताईंनी मेंदी लावल्यामुळे रिसिव्हर पुलंच्या हाती असतानाचं ते संभाषण जरूर पहा. नीलम प्रभूंच्या आवाजाची ते साक्ष पटवेल.

बबन आणि नीलम यांच्या विवाहाचे साक्षीदार होते माझ्या एका आत्याचे मिस्टर विद्याधर परांजपे. ते दोघंही त्यांना ‘विद्यामामा’ म्हणायचे. अनेक दिवसांच्या आमच्या गप्पांमध्ये अशा अनेक गोष्टी उलगडत गेल्या. कालांतराने मी ‘श्री’ सोडले. बबन प्रभूही गेले. नीलम प्रभू यांनी आकाशवाणीवरचेच जुने सहकारी संगीतकार यशवंत देव यांच्याशी विवाह केला आणि त्यांचं नाव करुणा देव झालं.

आमच्या साप्ताहिक भेटीगाठी कधीच थांबल्या होत्या, पण एकदा दुर्गाबाई भागवत यांना भेटल्यानंतर वाटलं की, त्यांच्या ‘ऋतुचक्र’ या गद्य काव्यासारख्या पुस्तकाचं वाचन नीलमताईंनी करावं. पुन्हा अनेक वर्षांनी त्यांच्या घरी गेलो. यशवंत देव यांनी दार उघडलं आणि करुणा देव यांना बोलावलं, ‘‘अहो आमची बबन असल्यापासूनची जुनी ओळख आहे’’, त्या परिचित आवाजात बोलल्या. त्यांनी ‘ऋतुचक्र’चा ‘चैत्र वैशाख’ मनात वाचला. थोडय़ा वेळाने म्हणाल्या, ‘‘आता वाचते’’ आणि ते दोन महिने दुर्गाबाईंचे शब्द घेऊन नीलमताईंच्या स्वरात साकारले. ऐकणारे आम्ही दोघंच होतो. मी आणि यशवंत देव, मात्र ते रेकॉर्डिंग होण्याचा योग नव्हता. नंतर एकदाच एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली. आम्ही एकत्र चहा घेता घेता त्यांनीच ‘ऋतुचक्र’ची आठवण करून दिली, पण थोडय़ाच दिवसांत त्या आजारी पडल्या आणि या ‘गद्य लते’चा स्वर निमाला. आज सगळं आठवलं की, ते रेकार्डिंग न झाल्याची खंत वाटते.

– [email protected]