
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) कॉमन युनिव्हर्सिटी एण्ट्रन्स टेस्ट (सीयूईटी) परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ही परीक्षा 15 जुलै ते 10 ऑगस्टदरम्यान घेण्यात येणार आहे. मात्र या परीक्षेदरम्यान एमबीबीएस, बीडीएससह मेडिकल यूजी कोर्सेससाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी नीट यूजी परीक्षा 17 जुलै रोजी होणार आहे. देशातील हजारो विद्यार्थी या दोन्ही परीक्षांसाठी तयारी करीत आहेत, मात्र परीक्षा एकाच वेळी होणार असल्याने विद्यार्थ्यांना तयारी करणे कठीण जात आहे. त्यामुळे नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे.
नीट आणि सीयूईटी या दोन्ही परीक्षा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे घेण्यात येतात. सर्वात आधी नीट परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली. यादरम्यान सीयूईटी परीक्षादेखील जुलैमध्येच होणार असल्याचे समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. आता सीयूईटीचे वेळापत्रक आले असून या दोन्ही परीक्षा एकाच आठवडय़ात होणार असल्याचे दिसत आहे.
बारावीनंतर विद्यापीठ प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर सीयूईटी प्रवेश परीक्षा होणार आहे. ही परीक्षा 15, 16, 19 आणि 20 जुलै रोजी होईल. परीक्षेचा दुसरा टप्पा ऑगस्टमध्ये आहे. नीट परीक्षा 17 जुलैला आहे. नीटच्या आदल्यादिवशी सीयूईटी होणार असल्याने विद्यार्थ्यांना या महत्त्वाच्या दोन्ही परीक्षांचा अभ्यास करणे कठीण आहे. विद्यार्थ्यांना सीयूईटी परीक्षेचे हॉलतिकीट मिळाल्यावर परीक्षेची तारीख समजणार आहे. 15, 16, 19 आणि 20 जुलैदरम्यान सीयूईटी देणाऱया विद्यार्थ्यांना नीट परीक्षा देणे अवघड जाणार आहे.































































