NEET-UG paper leak case – मनीषा हवालदारचा ‘गॉड’ सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातून आवळल्या मुसक्या, लातूरच्या डॉक्टरलाही बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा पेपर फूट प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी मोठी कारवाई केली. सीबीआयने महाराष्ट्रातून आणखी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये लातूर येथील एक डॉक्टर आणि पुण्याच्या एका नामांकित कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्याचा समावेश आहे. या अटकेमुळे नीट पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची एकूण संख्या 13 झाली आहे.

नीट पेपरफुटीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा हवालदार हिच्या सीबीआय चौकशीतून धक्कादायक माहिती उघड झाली होती. या प्रकरणात तिच्या पतीचाही सहभाग असल्याचा दाट संशय असून त्यांच्या मोबाईलमध्ये ‘गॉड’ नावाने सेव्ह केलेला मोबाईल क्रमांक तेजस शहा या प्राध्यापकाचा असल्याची माहिती समोर आली आहे. याच तेजस हर्षदकुमार शहा (रा. पुणे) याला आणि लातूर येथील डॉक्टर मनोज शिरूरे याला सीबीआयने अटक केली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

सीबीआयच्या तपासात असे समोर आले की, डॉक्टर शिरुरे याने या घोटाळ्यातील मुख्य आरोपी पी. व्ही. कुलकर्णी याच्याकडून रसायनशास्त्राचे लीक झालेले प्रश्न मिळवले होते. हे प्रश्न त्याने याच प्रकरणातील आरोपी कोचिंग सेंटर मालकाच्या मुलासह इतर तीन विद्यार्थ्यांना पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर तेजस शहा हा पुण्यातील डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी येथील प्राध्यापक आहे. शहा याने यापूर्वीच अटक करण्यात आलेली आरोपी मनीषा हवालदार हिच्याकडून नीट परीक्षेचे लीक झालेले भौतिकशास्त्राचे प्रश्न मिळवले होते.

सीबीआय लवकरच आरोपपत्र दाखल करणार – सूत्र

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणाचे मूळ शोधण्यासाठी सीबीआयने आतापर्यंत देशभरात 49 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआय या प्रकरणी लवकरच आपले पहिले आरोपपत्र न्यायालयात दाखल करणार आहे. या पहिल्या आरोपपत्रात शिक्षक पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा मंधारे आणि मनीषा हवालदार यांना मुख्य सूत्रधार म्हणून नामनिर्देशित केले जाणार आहे. या तिघांनी अनुक्रमे रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र या तिन्ही विषयांचे पेपर लीक केल्याचा प्राथमिक निष्कर्ष सीबीआयने काढला आहे.

‘नीट’ पेपरफुटी प्रकरण – IAS, IPS अधिकाऱ्यांसह त्यांच्या मुलांची चौकशी कधी? CBI वर ‘लॉबी’चा दबाव, राज्य सरकारमधील बडे मासेही सुटले