17 वर्षांच्या नातीची आजी-आजोबांनी केली हत्या, कारण वाचाल तर हादराल

उत्तर प्रदेशातील देवरिया इथे सुसंस्कृत समाजाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. देवरिया जिल्ह्यातील महुआडीह भागात 17 वर्षांच्या मुलीचा खून करण्यात आला होता. तिचा मृतदेह तिच्या घरापासून 20 किलोमीटर अंतरावर एका पुलाजवळ सापडला होता. नेहा पासवान असं या मुलीचं नाव असून तिचे वडील अमरनाथ हे मजूरकाम करतात. कामानिमित्त ते लुधियानाला गेले होते. त्यांना जेव्हा मुलीची हत्या झाल्याचं कळालं तेव्हा ते तडक आपल्या घरी पोहोचले होते.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर नेहाच्या आईची चौकशी केली. आईने सांगितलं की ही घटना 20 जुलै रोजी म्हणजेच सोमवारी नेहाचा उपवास होता. सकाळी उठून तिने पूजा-अर्चा केली होती. संध्याकाळी आंघोळ केल्यानंतर तिने जीन्स-टॉप घालून पूजा केली. पूजेच्या वेळी सगळं शांत होतं. पूजा झाल्यानंतर तिचे आजी-आजोबा आणि काका-काकू तिच्या अंगावर धावून गेले. या सहा जणांनी जीन्स का घातलीस ? असं म्हणत तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली. नेहाने त्यांना उत्तर देत म्हटलं की ‘जीन्स सरकारने परिधान करण्यासाठी बनवली आहे,यामुळे मला ती घालायची आहे. मला शिकायचं असून समाजात वावरायचं आहे’

नेहाने दिलेलं उत्तर तिच्या आजी-आजोबांना आणि काका-काकूंना सहन झालं नाही. त्यांनी नेहाला मारहाण करायला सुरुवात केली. तुला जीन्स घालू देणार नाही आणि शिकूही देणार नाही असं म्हणत त्यांनी नेहाला मारहाण केली. या मारहाणीमुळे नेहा गतप्राण झाली होती. नेहाची आई शकुंतला देवी हिने पोलिसांना सांगितलं की नेहाच्या आजी-आजोबा आणि काका-काकूंनी सांगितलं की तुझी मुलगी बेशुद्ध पडली असून आम्ही तिला रुग्णालयात नेतोय. ज्या पद्धतीने तिला रिक्षात घालण्यात आलं त्यावरून आपल्या मुलीचा मृत्यू झाला असावा अशी शकुंतला देवीला शंका आली होती. तिने ‘मुलीसोबत मी ही येते’ असं अनेकदा विनवलं मात्र तिला या सहा जणांनी नेलं नाही.

शकुंतला देवी हिने तिच्या नातेवाईकांना या प्रकाराबाबत सांगितलं असता त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आणि नेहाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना इथे कोणतीही अशा नावाची मुलगी आली नसल्याचं सांगण्यात आलं. यानंतर शकुंतला देवी आणि इतरांनी नेहाचा शोध घ्यायला सुरुवात केली. शोधाशोध करत असताना नेहाचा मृतदेह गंडक नदीवरील पुलाजवळ सापडला. आरोपींनी नेहाचा मृतदेह नदीत फेकून देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिचा पाय गटारावरील जाळीत अडकला होता.

पोलिसांनी या प्रकरणी नेहाचे आजोबा परमहंस, आजी भगना देवी, काका व्यास, काकू गुड्डी देवी, दुसरा काका अरविंद दुसरी काकू पूजा देवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अरविंद पासवानचा मित्र राजू यादव आणि रिक्षाचालक हसनैन यांच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बीबीसी हिंदीने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटलं की नेहा ही आठवीत शिकत होती आणि तिला पुढचं शिक्षण घेऊन पोलीस दलात जायचं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या