
चेंबूरमधील इंद्रचंद्र बालोटिया या व्यावसायिकाच्या चार वर्षांच्या मुलाचे 50 हजारांसाठी अपहरण झाले होते. त्यांच्या मुलाला घेऊन कामगार नाशिकला पळाला होता. पण नेहरूनगर पोलिसांनी अपहरणकर्त्याला अटक करून मुलाची सुखरूप सुटका केली.
आरोपी रामपाल तिवारी हा इंद्रचंद्र यांच्याकडे कामाला होता. रामपाल दारू पिऊन कामाला येत असल्यामुळे त्याला कामावरून काढले होते. सोमवारी पगाराचे पैसे मागण्यासाठी रामपाल इंद्रचंद्रकडे गेला होता. इंद्रचंद्रने त्याला पगाराचे पैस दिले. मात्र रामपालने आणखी 50 हजारांची मागणी केली. इंद्रचंद्रने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर रामपाल पुन्हा दारू पिऊन आला आणि त्याने इंद्रचंद्रच्या मुलाचे अपहरण केले. बराचवेळ मुलगा न दिसल्याने इंद्रचंद्रने त्याची शोधाशोध केली. तेव्हा रामपाल मुलाला घेऊन गेल्याचे शेजाऱयांनी सांगितले. इंद्रचंद्रने नेहरूनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक भाबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी रामपालच्या मोबाईलचे लोकेशन तपासल्यावर तो कल्याणमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कल्याणला जाऊन तेथील हॉटेल, लॉजेसची तपासणी केली पण तो सापडला नाही. परिसरातील सीसीटीव्ही तपासल्यावर रामपाल नाशिकमध्ये असल्याचे स्पष्ट झाले. मग नेहरूनगर पोलिसांनी नाशिक रोड पोलिसांच्या मदतीने रामपालला पकडले आणि त्याच्या ताब्यातून मुलाची सुखरूप सुटका केली.

































































