जनतेच्या पैशातून नेहरूंना ‘बाबरीची’ उभारणी करायची होती, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे विधान

rajnath-singh

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात वादग्रस्त विधानं केली आहेत. यावेळी त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कारकिर्दीत घेतलेल्या निर्णयांवर टीका केली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची इच्छा होती की ‘बाबरी मशिदी’ची उभारणी सार्वजनिक निधीतून व्हावी, मात्र सरदार पटेल यांनी तसे होऊ दिले नाही, असे विधान त्यांनी यावेळी केले.

गुजरातमधील वडोदरा जवळील साधली गावात मंगळवारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘युनिटी मार्च’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी देशाला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची इच्छा होती की त्यांना ‘बाबरीची’ उभारणी सार्वजनिक निधीतून व्हावी,मात्र त्यावेळी सरदार पटेल यांनी त्यांची ही योजना यशस्वी होऊ दिली नाही. पटेल हे खरे धर्मनिरपेक्ष नेते होते, पण त्यांनी कधीही कोणत्या समाजाचे लांघुनचालन केले नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी नेहरूंच्या कार्यकाळात झालेल्या आणखी एका निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरदार पटेलांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकासाठी सामान्य जनतेने गोळा केलेला निधी गावांमध्ये विहिरी आणि रस्ते बांधण्यासाठी वापरला जावा, असे नेहरूंचे मत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यावेळच्या सरकारला पटेलांचा महान वारसा दडपून टाकायचा होता, असे सिंह म्हणाले. तसेच, नेहरू यांनी स्वतःला ‘भारतरत्न’ दिला, पण पटेलांना त्या वेळी का दिला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ उभारून पटेलांना योग्य सन्मान मिळवून दिला, असे सिंह म्हणाले.

संरक्षण मंत्र्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचाही संदर्भ दिला. 1946 मध्ये बहुतांश काँग्रेस सदस्यांनी सरदार पटेलांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. तरीही महात्मा गांधींच्या सल्ल्यावरून पटेल यांनी नेहरू यांना संधी मिळण्यासाठी आपले नाव मागे घेतले होते असेही यावेळी ते म्हणाले.