नेपाळचा रामदेवबाबांना झटका, घातली कोरोनिल औषधाच्या विक्रीवर बंदी

बाबा रामदेव यांना नेपाळ सरकारने मोठा झटका दिला आहे. पतंजलीद्वारे निर्मित कोरोनिल किटच्या वितरणावर नेपाळ सरकारने बंदी घातली आहे. कोरोनिल औषध कोरोना विषाणूच्या संसर्गाविरोधात प्रभावी असल्याचा एकही ठोस पुरावा नसल्याचे नेपाळने म्हटले आहे. नेपाळच्या आयुर्वेद आणि पर्यायी औषध विभागाने दिलेल्या आदेशानुसार कोरोनिलच्या 1500 किट खरेदी करण्यात योग्य प्रक्रियेचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळेच कोरोनिलचे वितरण तात्काळ थांबविण्यात आले आहे. याआधी रामदेवबाबा यांनी हिंदुस्थानात कोरोनिल औषधामुळे कोरोना बरा झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर देशात वाद निर्माण झाला. त्यानंतर रामदेवबाबा यांनी हे औषध रोगप्रतिकार शक्ती वाढवत असल्याचे म्हटले. भूतान नंतर कोरोनिलच्या वितरणावर बंदी घातलेला नेपाळ हा दुसरा देश आहे. अलीकडेच भूतान औषध नियामक प्राधिकरणाने या औषधाच्या वितरणावर बंदी घातली.

आपली प्रतिक्रिया द्या