
पाथर्डी तालुक्यातील अकोला येथे दोन सख्या भावांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून पुतण्याने सख्या चुलत्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याची हत्या केल्याची घटना घडली. रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घडली आहे.वादाचे ठोस कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पाथर्डी तालुक्यातील अकोला येथील पिंटया उर्फ बाबासाहेब देवराव गिरी (वय 45)व त्यांचे सख्वे थोरले बंधु दत्तु देवराव गिरी अकोला गावात वस्तीवर राहात आहेत. रविवारी दुपारी दोघा बंधुमध्ये दत्तु गिरी यांच्या वस्तीवर किरकोळ स्वरूपाचे वाद झाले. ते मिटल्यानंतर बाबासाहेब गिरी आपल्या घरी गेले. मात्र बाबासाहेब गिरी यांच्या वस्तीवर दत्तु गिरी याचे ट्रॅक्टर होते. ते आणण्यासाठी दत्तु गिरी यांचा मुलगा पिल्या उर्फ तुळशीराम दत्तु गिरी हा चुलता बाबासाहेब गिरी यांच्या घरी गेला. ट्रॅक्टर चालु केले त्यावेळी वडील व चुलत्यामध्ये झालेल्या वादाचा राग डोक्यात असलेल्या तुळशीरामने चुलते बाबासाहेब गिरी यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. त्यात बाबासाहेब गिरी गंभीर जखमी झाले. नातेवाईकांनी त्यांना तत्काळ पुढील उपचारासाठी पाथर्डी येथे उपाजिल्हा रुग्णालयात हालविले. मात्र, त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेत इतर तीनजण जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी तातडीने सहकाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी संशयीत आरोपी पिल्या उर्फ तुळशीराम दत्तु गिरी यास घटनास्थळावरून घटनेतील ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले आहे. मृत बाबासाहेब गिरी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता. रात्री उशीरापर्यंत याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.






























































