नेरुळमध्ये इमारतीचे चार स्लॅब कोसळले , दोघांचा मृत्यू, दोघे जखमी गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धोकादायक झालेल्या नेरूळच्या तुलसी भवन इमारतीचे चार स्लॅब कोसळल्याची घटना आज रात्री घडली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना बाहेर काढल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास बचाव कार्य थांबवण्यात आले.

नेरुळमधील सेक्टर 6 मधील प्लॉट क्रमांक 313 वर तुलसी भवन ही जुनी इमारत आहे. तीन मजली असलेल्या या इमारतीच्या सी विंगमध्ये आज रात्री 9.30 च्या सुमारास तिसऱया मजल्याचा स्लॅब दुसऱया व दुसऱया मजल्याचा स्लॅब पहिल्या मजल्यावर असे लागोपाठ चार स्लॅब पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. सी विंगमध्ये एकूण 13 कुटुंबे राहत होती. या दुर्घटनेत चार रहिवासी ढिगाऱयाखाली अडकले. त्यापैकी बाबाजी शिंगाडे आणि एका रहिवाशाचा मृत्यू झाला. शोभा शिंगाडे यांच्यासह दोघे जखमी झाले. जखमी रहिवाशांना नेरूळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 सी विंगमधील तिसऱया माळ्यावर एका घरात लादी बसवण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असतानाच त्या माळ्यावरील स्लॅब खाली आला. त्यानंतर एका पाठोपाठ एक सर्व माळ्यांचे स्लॅब खाली आले.