फोर्टमधील ‘ईएनटी’ रुग्णालयावर ब्रिटिशकालीन मनोरा पुन्हा झळकणार!

416

पालिकेच्या फोर्टमधील ‘ईएनटी’ रुग्णालयावरील ब्रिटिशकालीन 27 फूट मनोरा लवकरच पुन्हा एकदा झळकणार आहे. ‘ईएनटी’ रुग्णालय असलेल्या या संपूर्ण इमारतीची आवश्यक डागडुजीही करण्यात येणार असल्यामुळे वास्तूला हेरिटेज गतवैभव मिळणार आहे. दोन टप्प्यांत इमारतीचे काम होणार असून पालिका यासाठी  एकूण 20 कोटी रुपये खर्च करणार आहे.

फोर्ट परिसरात पालिकेचे हे आत्माराम जेसासिंग बाकेबिहारी हे कान, नाक व घसा आजारांवरील रुग्णालय दोन मजली इमारतीत आहे. दर्जेदार आणि अद्ययावत उपचार मिळत असल्यामुळे सर्वसामान्यांप्रमाणे अनेक बडय़ा व्यक्तीही या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयाची इमारत ही ब्रिटिशकालीन गॉथिक शैलीतील आहे. या हेरिटेज इमारतीवर असणारा दिमाखदार मनोरा काही वर्षांपूर्वी जीर्ण झाल्याने काढण्यात आला होता. त्यामुळे रुग्णालय इमारतीला गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी इमारतीची आवश्यक दुरुस्ती आणि मनोरा उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या पुरातन वास्तू विभागाकडून घेण्यात आला. सध्या इमारतीचे इंटेरियर आणि मनोरा उभारण्याचे काम सुरू झाले आहे.

असा उभारणार मनोरा

ब्रिटिशकालीन मनोरा हा दगड आणि लाकडापासून बनवण्यात आला होता, मात्र सध्या इतक्या मोठ्या प्रमाणात वजन इमारतीवर टाकणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे नव्याने बनवण्यात येणारा मनोरा हा त्याच धर्तीवर आकर्षक बनवण्यासाठी ‘ग्लास रेनफोर्स्ट काँक्रीट’चा वापर करण्यात येणार आहे. या मटेरियलने बनवण्यात येणारा मनोरा हा दगड आणि लाकडापासून बनवल्यासारखाच आकर्षक दिसणार असल्याचे काम करणार्‍या ‘वास्तू विधान प्रोजेक्ट’चे आर्किटेक्ट राहुल चेंबूरकर यांनी सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या