चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष,मंगलप्रभात लोढा मुंबई अध्यक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bjp-logo

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी विद्यमान महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची निवड केली आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपा सरचिटणीस अरुण सिंग यांनी आज नव्या नियुक्त्या जाहीर केल्या.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीकर भाजपने महाराष्ट्रात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेते म्हणून ओळखले जाणारे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मर्जीतील विश्वासू  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपाने प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. तर मुंबई भाजपा अध्यक्षपदी आ. मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महसूल व सार्वजनिक बांधकाम खात्यासह महत्वाची खाती आणि मंत्रिमंडळात दुसऱ्या स्थानावर असलेले चंद्रकांत पाटील मंत्रीपद सोडून पक्षकार्याला जुंपून घ्यायला फारसे इच्छुक नव्हते. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने केंद्रात गृहमंत्री अमित शाह यांना जसे एक व्यक्ती , एक पद यातून मुभा देण्यात आली तशीच मुभा चंद्रकांत पाटील यांना देत प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.

मुंबईतील अमराठी मतांवर डोळा

विधानसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी करताना मुंबईतील अमराठी मतांवर भाजपाने लक्ष केंद्रीत केले आहे. गुजराती, मारवाडी व अन्य भाषिक मतदारांची मुंबईतील संख्या विचारात घेता आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबईची जबाबदारी भाजपने सोपविली आहे. निवडणुका म्हटल्या की सर्व गटातटाच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काम करणे आवश्य असते.  बांधकाम व्यवसायिक असणाऱ्या लोढा यांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध असल्याने त्याचा निश्चित फायदा निवडणुकीत होईल.

शांत आणि संयमी स्वभाव

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाला यश मिळकून देण्यासाठी कंबर कसली होती. त्यांनी आखलेल्या रणनीतीमुळे भाजपाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये लक्षणीय यश मिळाले होते. तसेच बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्याविरोधात तगडा उमेदवार उभा करून राष्ट्रवादी काँग्रेसची बालेकिल्ल्यातच कोंडी केली होती. विद्यार्थी दशेपासून समाजकार्यात असणारे पाटील यांच्याकडे असणारे पाटील यांचे संघटन कौशल्य, शांत आणि संयमी स्वभाव ही त्यांची जमेची बाजू आहे.