
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने इंडियन प्रीमियर लीगच्या अठराव्या हंगामाचे विजेतेपद पटकावले. तेव्हापासून RCB मागे लागलेले शुक्लकाष्ठ कमी व्हायचे नाव नाही. बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानाबाहेर चेंगराचेंगरी झाल्याने 11 चाहत्यांचा मृत्यू झाला. याला RCB फ्रेंचायझीचा गलथानपणा जबाबदार असल्याचा अहवाल कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात दिला. हा वाद थांबत नाही तोच RCB चा स्टार खेळाडू यश दयाल याच्यावर एका तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. आता यश दयाल याच्यावर आणखी एक तरुणीने असाच आरोप केला आहे.
IPL दरम्यान आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार तरुणीने दाखल केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ब्लॅकमेल करत हा प्रकार सुरू होता असा आरोप पीडितेने केला. या प्रकरणी जयपूरच्या सांगानेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे यश दयाल याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पीडित तरुणी क्रिकेट खेळत असताना यश दयाल याच्या संपर्कात आली होती. दोन वर्षांपूर्वी पीडिता अल्पवयीन होती. जयपूरमध्ये दोघांची भेट झाली होती. आयपीएलचा 2025 चा सामना खेळण्यासाठी यश तेव्हा जयपूर येथे आलेला होता. त्यावेळी त्याने क्रिकेटमध्ये करिअर बनवून देतो असे आमिष दाखवले आणि टिप्स देण्याच्या बहाण्याने सीतापुरा येथील एका हॉटेलमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार केला, असे पीडित तरुणीने आपल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.


























































