
देशात 100 दिवसांतून अधिक काळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाशी संबंधित ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणातील आरोपी निकिता जेकब आणि शंतनू मुळुक यांच्या अटकेला 15 मार्चपर्यंत स्थगिती देत दिल्ली सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. या दोघांनीही न्यायालयात आपल्या अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी करताना मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी निकिता व शंतनू यांना काहीसा दिलासा देणारा निर्णय दिला. या प्रकरणातील तिसरी आरोपी बंगळुरूची कार्यकर्ती दिशा रवी हिला याआधीच न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दिल्ली पोलिसांनी वकील निकिता जेकब आणि अभियंता ते सामाजिक कार्यकर्ता असा प्रवास करणारा शंतनू मुळुक यांच्यावर टूलकिटमधील मजकुराने देशाची प्रतिमा खराब करण्याचा राजद्रोह केल्याचा आरोप ठेवला आहे.



























































