आता मंगळावरच्या मातीत उगवलेल्या टोमॅटोपासून केचअप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगळ ग्रहावरच्या मातीत उगवलेल्या टोमॅटोपासून केचअप तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे. अमेरिकन फूड कंपनी ‘हेन्झ’ने मंगळ ग्रहासारख्या मातीत पिकवलेल्या टोमॅटोपासून नवीन ‘मार्स एडिशन’ टोमॅटो केचअप तयार केला आहे.

एकीकडे मंगळावर जीवसृष्टीवर संशोधन सुरू असताना भविष्यात माणूस मंगळावर कसा राहील या प्रयत्नांचा भाग म्हणून संशोधकांनी तिथल्या मातीत टोमॅटो उगवून केचअप तयार करण्याचा प्रयोग केला आहे. मंगळावरची माती पृथ्वीसारखी नाही. मंगळाची माती पिकांसाठी य़ोग्य समजली जात नाही.  त्या मातीत सेंद्रिय पदार्थ नसतात. याशिवाय मंगळावर सूर्यप्रकाशही कमी पोहोचतो. त्यामुळे टोमॅटोचे उत्पादन वाढवण्यासाठी संशोधकांच्या टीमने नवे तंत्रज्ञान शोधून काढले.

भविष्यात माणसाने मंगळावर स्वतः शेती करावी या दिशेने संशोधकांचे काम सुरू आहे. संशोधकांच्या टीमने मंगळ ग्रहासारखे हरितगृह वातावरण तयार केले आणि मंगळासारखीच माती वापरली. या प्रयोगासाठी उत्तम बियाणे घेण्यात आले आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची वाढ करण्यात आली. अशातऱहेने मंगळावरच्या मातीत उगवलेल्या टोमॅटोचे हेन्झ पंपनीने  केचअप तयार केले.

 ‘मार्स एडिशन’ टोमॅटो केचपची चव साधारण टोमॅटो केचपपेक्षा वेगळी असल्याचे आढळले आहे. भविष्यात मंगळावर जाणारे लोक त्या ग्रहाच्या मातीत टोमॅटो पिकवून केचप बनवू शकणार आहेत.