अत्याचार झाला नाही, मी चक्कर येऊन लोकलमधून कोसळले; बेशुद्धावस्थेत सापडलेली तरुणी शुद्धीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

अत्याचार झालेला नाही किंवा मला कोणीही ढकलून दिलेले नाही. चक्कर आल्यामुळे मी लोकलच्या दरवाजातून खाली कोसळले, अशी जबानी वाशी खाडीतील रेल्वे पुलावर जखमी अवस्थेत सापडलेल्या तरुणीने शुध्दीवर आल्यानंतर दिली. मंगळवारी पहाटे ती बेशुद्धावस्थेत ट्रकवर सापडली होती.

ही तरुणी टिटवाळा येथे राहते. तिच्या जबानीतून सर्व घटनाक्रमांचा उलगडा झाला. चक्कर आल्यामुळेच मी दरवाजातून खाली पडले, असे तिने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांनी अत्याचाराच्या शक्यतेवरून दाखल केलेले गुन्हे मागे घेतले आहेत.

सीसीटीव्हीमध्ये एकटीच

या तरुणीवर अत्याचार झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केल्यानंतर तिच्याबरोबर कोण होते, याचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांनी सर्व रेल्वे स्थानकांतील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. दादरपासून ते वाशीपर्यंत ही तरुणी अनेक सीसीटीव्हीमध्ये एकटीच असल्याचे दिसले आहे. वाशी रेल्वे पोलीस आणि गुन्हे शाखा यांचे संयुक्त पथक चौकशी करत होते. अधिक तपास सहायक निरीक्षक रुपाली पोळ या करीत आहेत.

नऊ तास ट्रॅकवर पडून

बॉयफ्रेण्डबरोबर भांडण झाल्यानंतर ही तरुणी ट्रेनमधून एकटीच भटकत होती. रात्री साडेआठच्या सुमारास लोकल वाशी खाडीपुलावर आल्यानंतर ती खाली कोसळली. या पुलावर दोन्ही ट्रॅकच्या मध्ये खोलगट भाग आहे, त्यामध्ये ती पडली. त्यामुळे रात्रीच्या वेळी हा प्रकार कोणत्याही मोटरमनच्या लक्षात आला नाही. सकाळी तिला काही अंशी शुध्द आल्यानंतर ती थोडी वर आली आणि मोटरमनच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तिला रुग्णालयात दाखल केले.