
सामना ऑनलाईन । मुंबई
मानव जीवनाच्या उत्थानासाठी समस्यांच्या सागराला ओंजळीत घेऊन हजारो वर्षांनंतर जन्मलेल्या पिढ्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचं सामर्थ्य असलेल्या ऋषी अगस्तीचं चरित्र लवकरच ‘मांदार्य’ या कादंबरीतून सर्वांसमोर येणार आहे. कादंबरीकार राजेंद्र खेर लिखित ‘मांदार्य’चे मुखपृष्ठ नुकतेच त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून प्रसिद्ध केले आहे. यानंतर ही कादंबरी कधी हातात पडते अशी उत्सुकता वाचकांना लागलेली आहे.
अथांग सागरासमोर हात पसरवून त्याला जणू कवेत घेण्यासाठी बलदंड शरीर, नेत्रांमध्ये प्रचंड विश्वास, अंगावर रुद्राक्षांच्या माळा, चेहऱ्यावर सूर्याचं तेज, आणि पर्वतासम खंबीर उभ असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अगस्त्य ऋषी, असं हे मुखपृष्ठ सजलेलं आहे. ‘मंजुल पब्लिशिंग हाउस’ हे ‘मांदार्य’चे प्रकाशक असून सुप्रसिद्ध चित्रकार देविदास पेशवे यांनी हे मुखपृष्ठ साकारलं आहे.
या कादंबरीबद्दल राजेंद्र खेर यांनी आपल्या एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आत्तापर्यंतच्या सर्व पुस्तकांमध्ये हे लेखन माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. सुमारे ११,००० वर्षांपूर्वीचा कालखंड मांडायचा होता, अनेक संदर्भ जुळवायचे होते. रामायण-महाभारत, अगस्त्य ऋषींवरील तेलुगू ग्रंथ, मत्स्य पुराणादी काही पुराणं याबरोबरचं असिरियन संस्कृतीतील ‘गिलगामेशचं महाकाव्य’ आणि ‘बायबल’मधून वगळलेलं ‘बुक ऑफ ईनॉच’, ‘सर्च इन सीक्रेट इजिप्त’ इत्यादी असंख्य संदर्भग्रंथ या कादंबरीसाठी उपयुक्त ठरल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
इतके वेगवेगळे ग्रंथ मिळवून अभ्यासण्याचं कारणही त्यांनी या पोस्टमध्ये दिलं आहे. अगस्त्य मुनींचा संबंध देवांशी होता. मग प्रश्न उभा राहतो, देव कोण? त्यांचं वास्तव्य कुठे होतं? या बाबतीत अशा अनेक गोष्टींचा शोध घेणं, संदर्भ लावणं अशा अत्यंत कठीण पण महत्वाच्या बाबी लक्षात घेऊन विविध ग्रंथांचा, पुस्तकांचा अभ्यास केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या अथक परिश्रमांतून साकार होणारा इतिहास या कादंबरीत सामावलेला आहे. त्यामुळे ही ‘मांदार्य’ कादंबरी केव्हा प्रकाशित होणार याकडे साऱ्यांचं लक्षं लागलं आहे.


























































