मेंदूच बनणार पासवर्ड

आपल्या संगणकाची, मोबाईलची, त्यातल्या माहितीची सुरक्षा हा प्रत्येकाच्याच चिंतेचा विषय असतो. सामान्य वापरकर्त्यापासून ते मोठमोठ्य़ा जागतिक कंपन्यांपर्यंत अनेकांनाच सुरक्षेची काळजी वाटत असते. अशा वेळी विविध उपाययोजना या सुरक्षेसाठी करण्यात येत असतात. फिंगरप्रिंट स्कॅनर, आयरिस स्कॅनर, फेसरीडर किंवा रेटिना स्कॅनर अशा वेगवेगळ्य़ा प्रकारात सध्या सुरक्षा प्रणाली उपलब्ध आहेत. मात्र एकदा त्यांचा वापर करून पासवर्ड सेट केल्यानंतर तो पुन्हा रिसेट करणे अशक्यच असते किंवा अतिशय अवघड तरी असते. मात्र आता शास्त्रज्ञांनी एका अनोख्या सुरक्षा तंत्रज्ञानाचा शोध लावला असून तुमचा मेंदूच तुमच्या पासवर्ड संरक्षकाची भूमिका निभावणार आहे. या नव्या तंत्रज्ञानात तुम्हाला सलग अशी चित्रांची मालिका दाखवली जाईल. या चित्रांकडे बघून तुमच्या मेंदूत काय विचार येतात त्या तरंगांचे विश्लेषण हे तंत्रज्ञान करणार असून जर तुमची ओळख पटली तर त्याद्वारे तुमच्या स्मार्टफोनचे लॉक उघडले जाणार आहे. या तंत्रज्ञानामध्ये सोप्या प्रकाराने पासवर्ड रिसेट करण्याची सुविधा असणार आहे. तसेच हे तंत्रज्ञान बायोमेट्रिक पद्धतीनेदेखील वापरता येणार आहे.

व्हॉटस्ऍपच्या पेमेंट फीचरवर शंका : सध्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात घडत असलेल्या धोकादायक घडामोडी आणि वापरकर्त्यांच्या माहितीची सुरक्षा या कारणांनी अतिशय सावध झालेल्या हिंदुस्थानच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉटस् ऍपच्या नव्याने सुरू झालेल्या पेमेंट फीचरविषयी National Payments Corporation of India (NPCI) ला काही प्रश्न विचारले असून त्याबद्दल त्वरित माहिती मागवली आहे. तसेच व्हॉटस् ऍप आपला डाटा फेसबुकसोबत शेअर करते का? हा गंभीर प्रश्नदेखील विचारण्यात आला आहे. व्हॉटस् ऍप कोणकोणता डाटा जमा करते आणि असा जमा केलेला डाटा कोणाशी शेअर करते का? हा माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा काळजीचा मुद्दा आहे. रिझर्व्ह बँकेलादेखील यासंदर्भात काही सूचना करायच्या असल्यास त्यादेखील मागवण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या