हिंदुस्थानी वंशाच्या रेडीओ होस्टच्या हत्येचा रचला होता कट, 3 खलिस्तानी दहशतवादी दोषी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑकलॅंडमधील हिंदुस्थानी वंशाचा लोकप्रिय रेडिओ होस्ट हरनेक सिंग यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन खलिस्तानी अतिरेक्यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे.हरनेक खलिस्तानच्या विचारसरणीच्या विरोधात आवाज उठवत असल्याने ते त्यांच्या निशाण्यावर होते.

ऑस्ट्रेलिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, हरनेक सिंग खलिस्तानच्या विचारसरणीच्या विरोधात आवाज उठवत आहे. याप्रकरणी सर्वजीत सिद्धू (27) याला खुनाच्या प्रयत्नात दोषी ठरवले असून सुखप्रीत सिंग (44) याला हत्येचा प्रयत्न करण्यास मदत केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. द ऑस्ट्रेलिया टुडेने एनजेड हेराल्डचा हवाला देत सांगितले की, तिसरी व्यक्ती 48 वर्षीय ऑकलॅण्ड निवासी आहे. त्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. बोललं जात आहे की, अलगाववादी हरनेक सिंग यांनी फुटीरतावादी चळवळीला विरोध केल्यामुळे त्यांच्याविरोधात रोष वाढला आणि त्यातून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश मार्क वूलफोर्ड यांनी सामुदायिक सुरक्षेवर आणि धार्मिक कट्टरतेविरुद्ध कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे निरिक्षणात नोंदवले.

हा हल्ला 23 डिसेंबर 2020 रोजी झाला होता. त्यानंतर हरनेक सिंगवर खलिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यावेळी त्याला 40 हून अधिक ठिकाणी चाकूने भोसकले होते. त्याला 350 हून अधिक टाके आणि अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. न्यायाधीश वूलफोर्ड सुनावणी करताना म्हणाले, “या प्रकरणात धार्मिक कट्टरता स्पष्टपणे दिसून येत आहे… शिक्षेसाठी वेगळ्या दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. समाजाला पुढील हिंसाचारापासून वाचवण्यावर आणि अन्य लोकांना यातून एक मेसेज मिळायला पाहिजे असे सांगितले. हरनेक सिंग यांना नेकी या नावानेही ओळखले जाते. त्याच्यावर हल्ला करण्यासाठी खलिस्तानी अतिरेकी कारमधून आले होते. एकाच वेळी त्या तिघांनी चाकू हल्ला केला. द ऑस्ट्रेलिया टुडेच्या वृत्तानुसार, हल्ल्यादरम्यान हरनेक कारपर्यंत पोहोचला आणि त्याने गाडी लॉक केली. त्यानंतर कारचा हॉर्न वाजवून लोकांना मदतीसाठी हाक मारली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. माजी बॉडीबिल्डर अवतार सिंगचा मित्र बलजिंदरने कोर्टात सांगितले की, त्याला हरनेकला मारण्यास सांगितले होते मात्र त्याने स्पष्टपणे नकार दिला होता. त्यांनी सांगितले की, 23 डिसेंबर रोजी जसपाल सिंह यांनी त्यांना फोन केला, ‘काम झाले, आता रेडिओवर येणार नाही.’

ऑस्ट्रेलिया टुडेने एनझेड हेराल्डचा हवाला देत वृत्त दिले आहे की, न्यायाधीशांना हरनेक सिंगचे शब्द आवडले आणि त्यांनी आरोपीला शिक्षा सुनावताना त्यांची पुनरावृत्ती केली. हल्ल्यातील 48 वर्षीय मास्टरमाइंडला साडे तेरा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्वजीत सिद्धूला साडेनऊ वर्षांच्या कारावासाची, तर सुखप्रीत सिंगला सहा महिन्यांची नजरकैदेची शिक्षा सुनावण्यात आली. पुरेशा पुराव्याअभावी जगराज सिंग आणि गुरबिंदर सिंग या दोन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली, तर अन्य दोन, जोबनप्रीत सिंग आणि हरदीप सिंग संधू, हरनेक सिंग यांच्या हत्येच्या प्रयत्नात सहभागी असल्याबद्दल खटल्याच्या प्रतीक्षेत आहेत.