
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
गांधीनगर जिल्ह्यातील कालोल रेल्वे स्थानकात एक स्त्री जातीचे नवजात बाळ सापडले आहे. या बाळाच्या पालकांनी तिला रेल्वे स्थानकातील बाकड्यांवर ठेवून तेथून पळ काढला. रात्री दहाच्या सुमारास स्टेशन मास्तरांना ते बाळ रडताना आढळून आले. त्यानंतर त्या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुनील पंडीत असे त्या स्टेशन मास्टरचे नाव असून ते रात्री स्टेशनवर फेरफटका मारत असताना त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यावेळी एका बाकड्यावर ते बाळ रडत असलेले त्यांना दिसले. त्या बाळाच्या अंगावर कपडे नव्हते. त्यांनी त्या बाळाला तत्काळ सराकरी रुग्णालयात दाखल केले. सध्या पोलीस त्या बाळाच्या आई वडिलांचा शोध घेत असून स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला त्या बाळाला स्थानकात सोडून जाताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी ओडीशामध्ये झुडुपात फेकलेल्या एका नवजात बालिकेच्या शरीराचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. एका कुत्र्याच्या तोंडात बाळाचा हात दिसून आल्यानंतर स्थानिकांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली होती.
























































