नवजात बालकांची श्रवणशक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिटचा वापर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात नवजात बालकांची श्रवणशक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिटचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी पुणे, गडचिरोली आणि जालना येथे यासंदर्भातील प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मोबाईल युनिटमुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी जाऊन नवजात बालकांची तपासणी होऊ शकते. त्याचबरोबर बालकांच्या लसीकरण सत्राच्या वेळीसदेखील श्रवणशक्ती तपासणी करता येऊ शकते. त्यासाठी मोबाईल युनिट वापर राज्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री टोपे यांनी मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत दिले. या प्रकल्पाची संकल्पना खासदार सुप्रिया सुळे यांची असून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे ‘अपंग हक्क विकास मंच’चे राज्य संघटक अभिजित राऊत यांनी सादरीकरण केले. नवजात बालकांमधील श्रवण चाचणी ऑटोकॉस्टीक इमिशन (OAE) पद्धतीद्वारे तपासणी कार्यक्रम राबविण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. बहिरेपणा रोखण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रम राज्यात 16 ठिकाणी राबविण्यात येत असून त्याची व्याप्ती वाढवितानाच संपूर्ण राज्यभर तो राबविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

  • बालकांमधील श्रवणशक्तीविषयक समस्यांची लवकर तपासणी झाल्यास त्यातील श्रवणदोष ओळखून आवश्यक तो उपचार करून त्यावर मात करता येते. त्यामुळे बालकांच्या सर्वांगीण विकासाकरिता हा कार्यक्रम राबविणे महत्वाचे आहे.