महिलांच्या इंटरनेट वापरात दुप्पट वाढ; शिक्षणातही सुधारणा, मात्र ग्रामीण-शहरी दरी कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील मुली आणि महिलांच्या शिक्षण तसेच डिजिटल सक्षमीकरणामध्ये लक्षणीय प्रगती होत असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (NFHS5, 2023-24) ताज्या अहवालातून समोर आले आहे. NFHS -5 (2019-21) आणि NFHS-6 या कालावधीची तुलना करता इंटरनेटचा वापर केलेल्या महिलांचे प्रमाण जवळपास दुपटीने वाढल्याचे दिसून आले आहे.

अहवालानुसार, इंटरनेटचा किमान एकदा वापर केलेल्या महिलांचे प्रमाण 33.3 टक्क्यांवरून 64.3 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तसेच 2 ते 4 वर्षे वयोगटातील बालकांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणातील उपस्थितीतही वाढ झाली असून हे प्रमाण 40.1 टक्क्यांवरून 47 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

महिलांच्या शैक्षणिक प्रगतीचेही सकारात्मक चित्र समोर आले आहे. 10 किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांचे शिक्षण पूर्ण केलेल्या महिलांचे प्रमाण 41 टक्क्यांवरून 46.4 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. यामुळे देशात महिलांच्या शिक्षणाबाबत आणि डिजिटल साधनांपर्यंत पोहोच वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.

मात्र, या प्रगतीबरोबरच ग्रामीण आणि शहरी भागांतील शैक्षणिक असमानताही अधोरेखित झाली आहे. 6 वर्षे व त्यावरील वयोगटातील मुलींची शाळेतील उपस्थिती शहरी भागात 84.3 टक्के असताना ग्रामीण भागात ती केवळ 69.2 टक्के असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

देशभरात महिलांच्या शिक्षण आणि डिजिटल प्रवेशात सकारात्मक बदल घडत असले तरी सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण-शहरी दरी कमी करण्याची गरज अद्याप कायम असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.