एनआयएने केला स्लीपर सेलचा पर्दाफाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
NIA

राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) राज्यातील आयएसआयएस मॉडय़ूलच्या स्लीपर सेलचा पर्दाफाश केला. एनआयएने मुंबईतील नागपाडा, पुणे, पडघा, ठाणे येथे कारवाई करून चौघांना अटक केली. ताशिब सिद्धिकी, जुबेर मोहम्मद शेख, शरजील शेख आणि झुल्फिकार बडोदावाला अशी त्या चौघांची नावे आहेत. परदेशातील हॅण्डलरच्या सूचनेनंतर त्या चौघांनी बंदी घातलेल्या संघटनेच्या दहशतवाद आणि हिंसाचाराच्या अजेंडय़ाला पुढे नेण्यासाठी एका या मासिकात प्रक्षोभक सामग्रीदेखील तयार केल्याचे तपासात समोर आले आहे.

आयएसआयएसशी संबंधित महाराष्ट्र मॉडय़ूलच्या स्लीपर सेलची माहिती एनआयएला मिळाली. त्या माहितीनंतर एनआयएने गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर एनआयएने आज मुंबईतील नागपाडा येथील ताशिबच्या, कोंढवा येथील जुबेरच्या, पडघा येथील शरजील आणि झुल्फिकारच्या घरी छापे टाकले. त्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि आयएसआयएसशी संबंधित कागदपत्रे जप्त केली. जप्त केलेल्या साहित्याने आरोपीचे आयएसआयएसशी संबंध समोर आले आहेत.

हिंदुस्थानाविरोधी अजेंडा पुढे नेण्यासाठी अनेक तरुणांना प्रवृत्त करण्याचा त्यांचा हेतू होता अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्या चौघांनी इस्लामिक स्टेट, इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हन्ट, इस्लामिक स्टेट ऑफ इराक यासारख्या वेगवेगळय़ा नावांनी ओळखल्या जाणाऱया आयएसआयएसच्या दहशतवादी कारवाया पुढे नेण्याचा त्याने कट रचला होता. हिंदुस्थानची एकता, सुरक्षा भंग करण्याच्या ते प्रयत्नात होते. आयएसआयएस या कटाचा भाग म्हणून त्याने राज्यात स्लीपर सेल सुरू केले होते. ताबिश, जुबेर, शरजील आणि झुल्फिकार आणि त्याच्या काही साथीदारांनी काही तरुणांची भरती केली होती. त्यांना घातक शस्त्रे बनवण्याचे प्रशिक्षण दिले गेले होते. तसेच त्या चौघांनी डु इट युअर सेल्फ किट संबंधित सामग्री तयार केली होती, असे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले.