पूरनचीही आंतरराष्ट्रीय कारकीर्द पूर्ण; वन डे आणि टी-20 क्रिकेटमधून वयाच्या 29 व्या वर्षीच निवृत्त, आता जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळण्यासाठी झाला मोकळा

वेस्ट इंडीजचा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आज तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. वयाच्या 29 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा करून त्याने वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का दिला. जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळण्यासाठी पूरनने हा निर्णय घेतल्याची चर्चा आता क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे.

निकोलस पूरन हा वेस्ट इंडीजसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 धावा करणारा फलंदाज होय. कुठलेही मतभेदाचे कारण नसताना या प्रतिभावान खेळाडूने ऐन फॉर्मात असताना सोशल मीडियावर भावनिक पोस्ट टाकून आपल्या निवृत्तीची घोषणा केली.  निवृत्तीचा निर्णय घेताना माझ्याही मनाची घालमेल झाली, पण खूप विचारपूर्वक मी हा निर्णय घेतलेला आहे, असे स्पष्टीकरणही त्याने दिले. निकोलस पूरनने श्रीलंकेविरुद्ध जुलै 2023 मध्ये अखेरचा एकदिवसीय, तर बांगलादेशविरुद्ध 2024 मध्ये अखेरचा टी-20 सामना खेळला होता. 2019 मध्ये चेंडू कुरडल्याप्रकरणी पूरनवर चार सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. 2022 पूरनला विंडीज संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. मात्र ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघाच्या खराब कामगिरीनंतर त्याने कर्णधारपद सोडले होते.

पूरनची भावनिक पोस्ट

‘मरून रंगाची जर्सी घालणं, राष्ट्रगीतासाठी अभिमानाने उभं राहणं आणि मैदानावर जिवाचं रान करणं या गोष्टी माझ्यासाठी किती बहुमोल आहेत, याचं मी शब्दांत वर्णन करू शकत नाही. वेस्ट इंडीज संघाचे कर्णधारपद भूषविणे ही माझ्या जीवनातील सर्वात मोठी भूषणावह बाब असून, हा क्षण मी तर कायम काळजाच्या कुपीत ठेवीन. चाहत्यांचा तर मी आयुष्यभर ऋणी राहीन. कारण संकटाच्या काळात तुम्ही माझ्या पाठीशी राहिलात, विजयी क्षणांचा तुम्ही मनापासून माझा जल्लोष केला. माझे कुटुंबीय, मित्र आणि संघसहकारी यांचाही माझ्या यशात तेवढाच मोलाचा वाटा आहे. त्यामुळे या सर्वांचे मनापासून आभार. माझ्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सांगता झाली असली तरी विंडीजच्या क्रिकेटबद्दलचे माझे प्रेम यतकिंचितही कमी होणार नाहीये, अशा शब्दांत निकोलस पूरनने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट करून दिली.’

टी-20 च्या लीगसाठी दिग्गजांच्या निवृत्तीची रांग

जगभरात सुरू असलेल्यी टी-20 लीगसाठी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातील दिग्गज एकामागोमाग धडाधड निवृत्त होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत मार्कस स्टॉयनिस, हेन्रीक क्लासन, ग्लेन मॅक्सवेल यांनी आपली निवृत्ती जाहीर केली होती. आता त्यात पूरनचाही समावेश झाला आहे. याचाच अर्थ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा टी-20 लीग क्रिकेटपटूंना जास्त फायद्याच्या आणि सोयिस्कर वाटू लागल्या आहेत. निवृत्तीचा असाच प्रकार सुरू राहिला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला याचा खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

पूरनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

डावखुरा फलंदाज अन् उजव्या हाताचा गोलंदाज असलेला निकोलस पूरन जबरदस्त यष्टिरक्षकही आहे. त्याने 2016 मध्ये दुबईत पाकिस्तानविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तीन वर्षांनी बार्बाडोसमध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटचा श्रीगणेशा केला. पूरनने कारकीर्दीत 61 एकदिवसीय, तर 106 टी-20 सामने खेळले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 11 अर्धशतके व 3 शतकांसह 1983 धावा केल्या. 2019च्या वर्ल्ड कपमध्येही त्याने विंडीजचे प्रतिनिधित्व केले होते. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 13 अर्धशतकांसह 2275 धावा फटकाविल्या आहेत, मात्र आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याला कधी कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही.