निघोजच्या मळगंगा देवी मंदिरातील चोरट्यांना 12 तासांच्या आत बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नगर

नगरमधील प्रसिद्ध निघोजच्या मळगंगा देवीच्या मंदिरात झालेल्या चोरीचा छडा नगर पोलिसांनी अवघ्या बारा तासात लावला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून आरोपींमध्ये एका सराफ व्यावसायिकाचा सुद्धा समावेश आहे. पोलिसांनी दोन पथकं तयार करून सखारपाम गावडे(19),रमेश उर्फ बाळू पडवळ (22), भास्कर पठवे ( 40) आणि राहुल उर्फ भाऊसाहेब निळे (27) या चोरट्यांसह चोरीचा माल घेणारा सोनार प्रशांत भुजबंद (35)सह एकुण 5 आरोपींना अटक केली आहे.

प्रसिद्ध मळगंगा मंदिरात चोरी, देवीच्या अंगावरील दागिने लुटले

पारनेर तालुक्यातील निघोजच्या मळगंगा देवीच्या मंदिरात 31 ऑगस्टच्या मध्यरात्री मंदिराचा दरवाजा तोडून चोरी झाली होती. चोरट्यांनी देवीच्या मुर्तीवरील सोने – चांदीचे दागिने आणि दानपेटी लंपास केली होती. यामध्ये देवीचा 8 ते 10 किलोचा चांदीचे दोन मुखवटे, चांदीची छत्री, चांदीचा एक किलो वजनाचा घोडा, सोन्याची नथ व इतर दागिने तसेच दानपेटीतील रक्कम चोरली होती.

दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा सर्व ऐवज आणि मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नगर आणि पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.