प्रसिद्ध मळगंगा मंदिरात चोरी, देवीच्या अंगावरील दागिने लुटले

सामना ऑनलाईन । नगर

नगरमधील प्रसिद्ध निघोजच्या मळगंगा देवीच्या मंदिरात चोरी झाली असून चोरट्यांनी देवीच्या मुर्तीवरील सोने – चांदीचे दागिने आणि दानपेटी लंपास केली आहे. या चोरीमुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत लवकरात लवकर चोरट्यांना पकडण्याची मागणी केली आहे.

मळगंगा मंदिरात दोन मोठ्या दानपेट्या आहेत. तसेच देवीचा 8 ते 10 किलोचा चांदीचा मुख्य मुखवटा, छोटा चांदीचा मुखवटा, चांदीची छत्री, चांदीचा एक किलो वजनाचा घोडा, सोन्याची नथ व इतर दागिने होते. हे सर्व दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. तसेच दानपेट्या फोडून त्यातील हजारोंची रक्कम चोरली आहे. तर मोठी दानपेटी फोडण्यात चोरटे अपयशी ठरले.

दरम्यान, मळगंगा मंदिराच्या शेजारीच पोलिस चौकी असूनही चोरट्यांनी डल्ला मारला, तसेच मंदिरातील सीसीटीव्ही बंद असल्याने चोरट्यांनी त्याचा गैरफायदा उठवला. त्यामुळे या चोरीवरून ग्रामस्थ पोलिसांवर तसेच प्रशासनावर संतापले आहेत.