
महापालिका प्रशासन थकीत मिळकतकर पूर्ण भरल्यानंतरच सील केलेल्या मालमत्तेचे सील काढते. त्यानंतरच मिळकतकरधारकाच्या आक्षेपावर विचार होतो. मात्र, तब्बल पावणेचार कोटी रुपयांचा मिळकतकर थकविल्याप्रकरणी भाजपच्या नीलेश राणे यांच्या शहराच्या मध्यवर्ती भागात आर डेक्कन येथील हॉटेलला पुणे महापालिकेने ठोकलेले सील अवघ्या 25 लाख रुपयांचा धनादेश दिल्यानंतर काढले. त्यामुळे सर्वसामान्यांना वेगळा आणि राणेंना विशेष न्याय कोणाच्या आदेशावरून, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांची भेट घेतली. याप्रसंगी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, उपशहरप्रमुख आनंद गोयल, माजी नगरसेवक बाळा ओसवाल, शहर संघटक राजेंद्र शिंदे, शैलेश मोरे, विकी धोत्रे, नंदू येवले, राहुल शेडगे, शशिकांत साटोटे, उमेश वाघ, संजय वाल्हेकर, मकरंद पेठकर आदी उपस्थित होते. भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
प्रकरणात सर्वसामान्यांच्या घरासमोर बँड वाजविला जातो. मात्र, राणेंच्या मिळकतीसमोर बँड वाजविला गेला नाही. पावणेचार कोटींची थकबाकी असताना पंचवीस लाख भरल्यानंतर सील केलेली मिळकत खुली केली. केवळ केंद्रीय मंत्र्याचा परिवार म्हणून ही सवलत दिली गेली का? मग सर्वसामान्यांना वेगळा न्याय का? असा सवालही त्यांनी केला. तर, मिळकतकर चुकीचा लागल्याचा दावा राणे कुटुंबीयांकडून केला जात आहे. मग आत्तापर्यंत याबाबत तक्रार किंवा पालिकेची कार्यवाही याबाबत प्रशासनाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. दोन दिवसांत माहिती देण्याचे आश्वासन उपायुक्त जगताप यांनी दिले आहे. याबाबतची माहिती न मिळाल्यास संजय मोरे म्हणाले, थकीत मिळकतकराच्या तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.
…तर ‘भीक मांगो’ आंदोलन
महापालिकेला राणेंच्या मिळकतकर प्रकरणाची कोणतीही माहिती देता आली नसून, केवळ उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. शहरातील नागरिक टॅक्स भरतात, तर राणेंनीदेखील टॅक्स भरावा. त्यामुळे पालिकेने राणेंकडून थकीत मिळकतकर लवकरात लवकर भरून घ्यावा. वेळ पडली तर राणे यांचा थकीत मिळकतकर भरण्यासाठी मॉलसमोरच ‘भीक मांगो’ आंदोलन करू, असा इशाराही शिवसेनेच्या वतीने यावेळी देण्यात आला.
“राणेंनी मिळकत करप्रकरणी जास्त कर लागल्याचा आक्षेप घेतला आहे. येत्या चार दिवसांत यासाठी स्पेशल बैठक लावली आहे. बैठकीनंतर तपासणी करून मिळकतकर भरून घेण्याची पुढील कार्यवाही करू.”
– विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका



























































