
मंदिराच्या भिंतीसह कळस कोसळल्याने नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव येथे घडली आहे. भावेश दिलीप पवार असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांनी मंदिराच्या तीन पदाधिकाऱयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भावेश हा गोरेगावच्या वालभट्ट रोड येथील संत रोहिदास नगर येथे राहत होता. शनिवारी दुपारी भावेश हा मंदिराजवळून जात होता. तेव्हा त्याच्या अंगावर मंदिराची भिंत कोसळली. त्यात भावेश हा गंभीर जखमी झाला.
या घटनेची माहिती स्थानिकांनी भावेशच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर भावेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच वनराई पोलीस घटनास्थळी गेले. भावेशच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मंदिराच्या तीन पदाधिकाऱयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

























































