
‘निर्भया’वरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार नराधम दोषींविरोधात सोमवारी पटियाला हाऊस कोर्टाने डेथ वॉरंट जारी केले आहे. गेल्या दीड महिन्यातील हे तिसरे डेथ वॉरंट आहे. नव्या डेथ वॉरंटनुसार चारही दोषींना 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता तिहार कारागृहात फाशी देण्यात येईल. असे असले तरी चारही दोषींना 3 मार्चला फाशी होणार नाही, असे चॅलेंज गेल्या सात वर्षांपासून निर्भयाच्या दोषींच्या बाजूने खटला लढणारे वकील ए.पी. सिंह यांनी दिले आहे.
‘दै. भास्कर‘शी बोलताना ए.पी. सिंह म्हणाले की, चार पैकी एका दोषीकडे अद्यापही दया याचिका आणि क्यूरेटिव्ह याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या दोन्ही याचिका फेटाळल्या गेल्यास दोषीकडे राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्याचाही पर्याय आहे. तसेच या दोषींवर दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक खटला सुरू असून यावर निर्णय येईपर्यंत दोषींना फाशी देता येणार नाही, असे ए.पी. सिंह यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, मी माझ्या अशीलाची भेट घेणार असून सर्व कायदेशीर पर्यायांबाबत चर्चा करेन. यानंतर ते जे म्हणतील, त्यांचे कुटुंबीय जे सांगतील ते मी करेन. त्यांच्याकडे अजुनही काही कायदेशीर पर्याय उपलब्ध असून या सर्वांचा वापर केला जाईल, असेही ए.पी. सिंह यांनी सांगितले. राष्ट्रपतींकडे पुन्हा एकदा दया याचिका पाठवण्यात येणार असून ते फेटळली गेल्यास जे पर्याय वाचतील ते सर्व वापरले जाईल.
यावेळी कायदेशीर पर्यायांचा वापर करून फाशी किती काळासाठी टाळली जाऊ शकते? असे विचारले असता ते म्हणाले की, ना मी इश्वर आहे, ना मी यमराज आहे. मी एक वकील आहे. जो अशील म्हणेल, त्याचे कुटुंबीय जे सांगतील त्याला मी सविधानाच्या कक्षेत राहून आणि सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या जजमेंटनुसार कायदेशीर पर्याय उपलब्ध करून देईन. तसेच यावेळी त्यांनी हा खटला राजकीय खेळ झाला असून दबाव वाढत असला तरी झुकणार नाही, असेही म्हटले.
तीन मार्चला फाशी होणार?
1. निर्भया प्रकरणातील मुकेश, विनय आणि अक्षय या तीन दोषींची क्यूरेटिव्ही याचिका फेटाळण्यात आलेली आहे. परंतु दोषी पवनकडे अद्यापही क्यूरेटिव्ह याचिकेचा पर्याय आहे.
2. पवनकडे क्यूरेटिव्ह याचिकेसह दया याचिकेचाही पर्याय आहे. ही याचिका फेटाळण्यात आल्यास यासह संविधानानुसार दोषींना पुन्हा एकदा दया याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे.
3. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्यास दोषी याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतो.






























































