निर्भया बलात्कार प्रकरण; नराधमांना फाशीची सजा सुनावणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली

1452

‘निर्भया’ बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देणारे करणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोरा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. न्यायाधीश अरोरा यांना एक वर्षासाठी प्रतिनियुक्तीच्या आधारावर अतिरिक्त रजिस्ट्रार म्हणून सर्वोच्च न्यायालयात पाठवले आहे. न्यायाधीश सतीश अरोरा यांनी ‘निर्भया’च्या गुन्हेगारांविरोधात काही दिवसांपूर्वी फाशीचे वॉरंट जारी केले होते. लवकर हे प्रकरण अन्य न्यायाधीशाकडे सोपवले जाईल.

महिला वकिलावर कंगना संतापली

‘निर्भया’ प्रकरणातील दोषींना क्षमा करावी, असे अपील ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिने वादात उडी घेत इंदिरा जयसिंह यांच्यावर आज हल्लाबोल केला. कंगना म्हणाली, इंदिरा जयसिंह यांच्यासारख्या स्त्र्ायांच्या उदरातून बलात्कारी जन्माला येतात. अशा स्त्र्ायांना बलात्कारी आरोपींसोबत चार दिवस ठेवले पाहिजे. फाशीच्या शिक्षेचे समर्थन केल्याबद्दल ‘निर्भया’ची आई आशादेवी यांनी कंगनाचे आभार मानले आहेत. मला महान बनायची इच्छा नाही. मी एक आई आहे. सात वर्षांपूर्वी माझ्या मुलीचा जीव गेला. मला न्याय हवाय, अशी प्रतिक्रिया आशादेवी यांनी दिली.

चौघांना विचारली अखेरची इच्छा

तिहार तुरुंग प्रशासनाच्या अधिकाऱयाने फाशीची तयारी सुरू केली आहे. तुरुंग प्रशासनाने चारही गुन्हेगारांना त्यांची शेवटची इच्छा, संपत्ती याबद्दल माहिती विचारली आहे. फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणी करण्यापूर्वी कैद्यांना त्यांची शेवटची इच्छा विचारली जाते आणि पूर्ण करण्यात येते. फासावर जाण्याआधी ते कुणाची भेट घेऊ इच्छितात, त्यांच्या नावावरची मालमत्ता किंवा बँक खात्यातील रक्कम ते कुणाच्या नावावर करू इच्छितात, कुणाला वारसदार जाहीर करण्यात आले आहे का? मृत्युपत्र करणार का? कोणते धार्मिक किंवा आवडतं पुस्तक वाचू इच्छित आहात का? असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. चारही आरोपी त्यांच्या इच्छेविषयी काहीच प्रतिक्रिया देत नसल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विनय शर्माने केला आत्महत्येचा प्रयत्न

‘निर्भया’ सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्माने तिहार तुरुंगात शौचालयात गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. विनयला 24 तासांसाठी वैद्यकीय देखरेख कक्षात ठेवण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सकाळी घडल्याचे विनय शर्माचे वकील ए. पी. सिंह यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या