
1800 रुपयांच्या हिशेबावरून वाद घालणाऱया काकूंचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. राजकीय नेत्यांनी या व्हिडीओचा वापर करून सोशल मीडियावर टोलेबाजी सुरू केली आहे. अनेक मीम्सही व्हायरल होत आहेत.
या काकूंनी तीन तरुणांना 1800 रुपयांच्या हिशेबावरून चांगलेच हैराण करून सोडले. काकूंनी घातलेला हा वाद सोशल मीडियावर चिघळला. युथ काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून देशातील घसरलेल्या जीडीपीवर अचूक निशाणा साधला आहे. काकूंना त्यांनी ‘निर्मला’ असे संबोधून ‘निर्मला काकू, अर्थतज्ञांशी जीडीपी ठरवण्याबाबत चर्चा करताना…’ अशी मिश्कील टीका केली आहे.
तांबे यांच्या ट्विटवरच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विरोधी पक्षाला लक्ष्य केले आहे. ‘सत्यजीतजी…परीक्षा का घेऊ नयेत हे समजून सांगता सांगतादेखील अशीच काहीशी स्थिती होती.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरवर नोंदवत त्यांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.
तुम्ही मला दीड हजार आणि 300 रुपये दिलेत, 1800 रुपये द्या!
या व्हिडीओमधील काकू तीन तरुणांकडून 1800 रुपये मागत आहेत. आम्ही तुम्हाला पाचशे रुपयांच्या तीन नोटा असे दीड हजार रुपये आणि नंतर 200 व 100 रुपयांची नोट असे 300 रुपये दिले असे तरुणांनी सांगूनही त्या मान्य करायला तयार नाहीत. पैसे मिळाले हे काकूंनी मान्य केले. पण ‘दीड हजार आणि 300 रुपये दिले, पण 1800 रुपये द्या. नाहीतर मी इथून जाणार नाही’ असा हट्टच त्यांनी धरला.
राज्य सरकारकडून दखल
या व्हिडीओची राज्य सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे. ‘ही घटना आम्ही सरकारपुढील आव्हान म्हणून पाहत असून महिला आर्थिक विकास महामंडळाकडून राबवला जाणारा आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही कार्यक्रम हाती घेणार आहोत.’ असे ट्विट महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे. घरकाम करणाऱया महिला अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेचा कणा असल्याने हिशेबात चूक होणे हा थट्टेचा विषय होऊ नये असेही त्यांनी नमूद केले आहे.


























































