भटकंती – पिरॅमिडच्या देशात फेरफटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> निर्मलकुमार देशमुख

अमेरिकेला जाण्यासाठी यावेळी मी कैरो-इजिप्त हा नवीन रस्ता घेण्याचे ठरवले. नवीन देश, पुरातन काळातील इजिप्त संस्कृती व पिरामिड पाहायला मिळणार होते. मुंबईहून साधारण साडेपाच तासांचा प्रवास करत कैरोला पोहोचलो. कैरोमध्ये पोहोचल्यानंतर साद नावाच्या इजिप्शिन ड्रायव्हरसोबत आमची इजिप्तची सफारी सुरू झाली. आपल्याला ढोबळमानाने इजिप्तची ओळख म्हणजे पुरातन पिरामिड, दगडाच्या प्राचीन मूर्ती, नाईल नदीची संस्कृती व सुवेझ कालवा असणारा देश अशी आहे. इजिप्तमधील पिरामिड, नाईल नदी, इजिप्शियन संस्कृतीचे संग्रहालय व कैरो शहर पाहायचे ठरविले. इजिप्शियन संस्कृतीचे पुरातन वस्तू असलेले संग्रहालय हे कैरो शहरातच आहे. तसेच प्रख्यात नाईल नदी ही कैरो शहरातून वाहते. नाईल नदीच्या पलीकडे गीझा नावाचे शहर असून तेथे प्राचीन पिरामिड्स आहेत.

ड्रायव्हर साद आम्हाला प्रथम कैरोमधील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संग्रहालय पाहण्यासाठी घेऊन गेला. या चाळीस मिनिटांच्या प्रवासात इजिप्तच्या कैरो शहराचे दर्शन होत होते. इजिप्शियन संस्कृतीचे हे संग्रहालय पाहणे म्हणजे इतिहासप्रेमी व्यक्तीला मोठी मेजवानी आहे. साडेचार हजार वर्षांपूर्वीच्या किंवा त्याआधीच्या आखीव रेखीव कोरीव मूर्ती, कपडे, दागिने, भांडे, इतर वापरायचे घरगुती साहित्य, हत्यारे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजघराण्यातील व्यक्तींचे शव आणि शवपेटय़ा अतिशय वैज्ञानिक व आकर्षक पद्धतीने मांडून ठेवलेल्या आहेत. संग्रहालयाच्या तळमजल्यावर जाण्यासाठी अतिशय आकर्षक पद्धतीने एक मोठय़ा विहिरीसारखा भाग तयार केला असून त्या विहिरीच्या गोल भिंतीवर ऐतिहासिक इजिप्शियन डिजिटल चित्र अतिशय आकर्षकपणे एकामागून एक येत असतात. हे पाहून आपण पुढे गडद अंधाऱया गुहेत जातो. या गुहेत 2500 वर्षांपूर्वीच्या ते 4500 वर्षांपेक्षा जास्त जुन्या इजिप्शियन राजघराण्यातील व्यक्तींची खरी प्रेते शवपेटीसह ठेवली आहेत. इथे संपूर्ण अंधार असून बरोबर शवपेटीवर व शवावर फोकस लाइट मारलेला असतो आणि त्यातून ते हजारो वर्षांपूर्वीचे शव पुढील अनंतकाळासाठी शवपेटीत ठेवलेले दिसते. अतिशय गूढ, रहस्यमय व काही व्यक्तींसाठी भीतिदायक वातावरण असते. प्रत्येक शवाच्या व्यक्तीचे नाव व काळाचा तपशील वाचायला मिळतो. इजिप्शयन संस्कृतीमध्ये राजघराण्यातील व्यक्ती (पारोज) मृत झाल्यानंतर ती पुढील जन्मात देव होते व ते देवत्व प्राप्त करण्याच्या अद्भुत प्रवासासाठी निघते. त्या प्रवासासाठी आवश्यक सर्व गोष्टी त्याच्या शवपेटीजवळ ठेवण्याची परंपरा त्याकाळात होती. हा एकूणच दोन तासांचा अनुभव अत्यंत थरारक असा होता. पुढे आम्ही प्राचीन पिरामिड पाहण्यासाठी गिझा शहराकडे मोर्चा वळविला. गिझामध्ये नाईल नदी नाईल नदीचे दर्शन घेतल्यानंतर अर्ध्या-पाऊण तासात गिझा शहरातील पिरामिडपर्यंत पोहोचलो. पिरामिड परिसर रिकामा असून सर्वत्र वाळवंट पसरले आहे.

एकूण तीन पिरामिड आहेत. सर्वात उंच वडील राजा खूपु यांचे. दुसरे मुलगा राजा खाप्रे यांचे व तिसरे नातू राजा मेंकावरे यांचे. हे तिघे एकामागून एक इजिप्तचे राजे होते. सर्वात उंच, मध्यम व लहान उंचीचे क्रमाने ही पिरामिड आहेत. या प्राचीन राजांची नावे खूप वेगळी व आपल्याला थोडी चमत्कारिक अशी वाटतील. सर्वात उंच पिरामिड शेजारी अगदी छोटे-छोटे तीन पिरामिड आहेत. त्या खुपू राजाच्या राण्या आहेत. प्रचंड मोठमोठे चौकोनी दगड रचून हे पिरामिड त्यावेळेस बांधले आहेत. यासाठी आणलेला भुरकट माती रंगाचा दगड हा दूर आफ्रिकेत असलेल्या खाणीतून उंट, हत्ती, घोडे, मानवी गुलाम यांच्याकडून ओढत आणून किंवा नाईल नदीवर बार्ज टाकून त्यावर हे अवाढव्य दगड ठेवून पाण्यातून वाहतूक करून इथे आणले आहेत. या पिरामिडवर आता पावेतो खूप संशोधन झाले असून आणखी अव्याहतपणे संशोधन चालू आहे. पिरामिडच्या आत शेवटपर्यंत जाता येते. शेवटी पिरामिडच्या मधोमध तळात एक खोली असते व तेथे मृत राजाचे शव तसेच त्याला पुढील जन्मी प्रवासात लागणाऱया वस्तू ठेवण्याची जागा आहे. सध्या या खोल्या रिकाम्या आहेत. पिरामिड पाहून अगदी थक्क व्हायला होते.

ख्रिस्ती धर्म जाऊन इस्लाम धर्म आल्यानंतर बाराव्या शतकात कुर्दिश सुलतान मलिक अल अझीझ ओटामान युसुफ याने हे पिरामिड तोडायला घेतले. पिरामिड तोडण्यासाठी खूप मजूर व खर्च येऊ लागला हे पाहून सुलतानाने हे पाडकाम मध्येच सोडून दिले. तरी पण तीन नंबरचे पिरामिड मध्यभागी बऱयापैकी तोडून नुकसान केले आहे. या पिरामिडवर अतिशय वेगळय़ा पद्धतीचे प्लॅस्टर केले होते. सूर्य उगवताच सूर्यकिरण जेव्हा पिरामिडवर पडत, तेव्हा हे तिन्ही पिरामिड हिऱयासारखे चमकून उठत. मात्र वरचे प्लॅस्टर उद्ध्वस्त केल्याने तो चमत्कार आता दिसत नाही.

मानवी इच्छाशक्ती व कल्पनेला मनोमनी सलाम करून पिरामिडचा निरोप घेत आम्ही परत कैरोकडे यायला निघालो. पुढे आम्ही नाईल नदीवरील क्रूज बोटीवर अरेबियन नाइट्स प्रोग्राम पाहण्यासाठी गेलो. नाईल नदी भव्य आहे. कैरोसारख्या मोठय़ा शहरातून वाहत असूनही अतिशय स्वच्छ, निर्मळ पाणी होते. जागोजागी बांध बांधून पाणी अडवल्याने नदीत मोठय़ा क्रूज बोटी चालतात. या बोटीवर अरेबियन जेवणाचा तसेच अरेबियन संगीत व अरेबियन सुंदरींच्या नृत्याचा अनुभव घेता येतो. हा अडीच-तीन तासांचा कार्यक्रम अतिशय आकर्षक, डोळे दीपवणारा असतो. नाईल नदीच्या दोन्ही काठांवर जगभरातल्या नामांकित ब्रँडची सर्व हाटेल्स आहेत. दिवसा पाहिलेले मातकट कैरो शहर नाईलच्या दोन्ही तीरांवर रात्री झगमगून उठते. अशा या प्राचीन संस्कृती व सभ्यता लाभलेल्या इजिप्तची भव्यता व सौंदर्य मनात साठवून परतीचा प्रवास सुरू केला.