अविनाशी जाणिवेच्या प्रकाशात…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>नितीन वैद्य

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, कांदबरीकार, समीक्षक त्र्यंबक विनायक सरदेशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षाची 22 नोव्हेंबर रोजी सांगता झाली. त्यांच्या मोजक्याच परंतु कसदार लेखनाचा पैस मोठा आहे. त्यातही कांदबरीकार, समीक्षक म्हणून त्यांचे योगदान वादातीतच म्हणावे लागेल. 

‘ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा, तेच पतित कीं जे आंखडिती प्रदेश साकल्याचा!’ साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, कादंबरीकार, समीक्षक त्र्यं.वि.सरदेशमुखांचे सगळे लेखन समग्रतेच्या शोधात, केशवसुत सांगतात त्या साकल्याच्या प्रदेशात घेऊन जाणारे आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यामुळे ते अधिकाधिक समकालीन होत आहेत. काल तीन भिन्न नावांनी कल्पिला जात असला (भूत, वर्तमान आणि भविष्य) तरी तो एकात्म आणि एकसार असतो, त्यांचे सत्त्व ग्रहणशक्तीत यायला हवे असे त्यांना वाटते. काळाचे एकात्म, समग्र भान देण्याचा प्रयत्न सरदेशमुखांनी आपल्या साहित्यातून केला. म्हणून त्यांची समीक्षाही त्यांच्या कादंबरीइतकीच सर्जनशील होते.

सरदेशमुखांचे लेखन मोजकेच, पण कसदार, काळावर आपली नाममुद्रा उमटवणारे आहे. त्यात आपल्या हयातीत त्यांचे 3 कवितासंग्रह, 4 कादंबऱया, 2 नाटके, 7 समीक्षा लेखसंग्रह, 3 अनुवाद आणि 1 शैक्षणिक अभ्यासार्थ ( सहलेखन ) अशी 20 तर त्यांच्या निधनानंतर 3 अनुवाद आणि 2 समीक्षेची ( पैकी 1 नाटय़विचार) अशी 5 अशी एकूण 25 पुस्तकं प्रकाशित झाली. त्याबाहेरही प्रस्तावना, संपादित पुस्तकांत समाविष्ट लेखन, कविता, कथा, पुस्तक परीक्षणे, समीक्षा लेख, आत्मपर लेखन असा बराच मोठा पैस आहे. तरी सरदेशमुख मुख्यतः ओळखले गेले ते कादंबरीकार, समीक्षक म्हणून. या दोन्ही क्षेत्रांतले त्यांचे योगदान असाधारण असे आहे .6

‘ससेमिरा’ ही त्यांची पहिली, विशीत आलेली (1944) आलेली कादंबरी. तरी नंतरही तो अनुभव त्यांना त्यातल्या नव्हाळीतल्या गुणदोषांसह त्याज्य वाटत नाही. मर्ढेकरांच्या अशाच दुर्लक्षित ‘शिशिरागम’बद्दल लिहिताना ते म्हणतात, ‘‘एखाद्याला त्याच्या समग्र आयुष्याच्या संगतीतून उठवून तिच्या निर्माण कर्तृत्वाचे मूल्यमापन करण्यात स्वाभाविक मोडतोड होते  हे आपण लक्षात घेत नाही.’’ श्री. पु. भागवत यांनी तिच्या प्रकाशनानंतर वीस वर्षांनंतर पहिल्या भेटीत तिची आठवण केली याचा त्यांना त्यामुळे स्वाभाविक आनंद होतो. पुढील ‘बखर एका राजाची’ (1972),  ‘डांगोरा एका नगरीचा’ (1998) आणि ‘उच्छाद’ (1978) ही सलग कथानक तरी प्रत्येकीला स्वतंत्र आस्वादमूल्य असलेली कादंबरीत्रयी ही मराठी साहित्यातली अशा प्रकारची अपूर्व रचना आहे. ‘फिक्शनल हिस्ट्री’ म्हणता येईल असे हे त्रय 1913 ते 1960 एवढा दीर्घ कालखंड व्यापणाऱया इतिहासाच्या एका विवक्षित तुकडय़ाचे, त्यातील ऱहासपर्वाचे तपशिलाने दर्शन घडवते. सरदेशमुखांवर असलेला वाचनाच्या, पुस्तकप्रेमाच्या संस्कारांची छाया फार सुंदर रीतीने ‘बखर…’मध्ये येते. स्वातंत्रपूर्व हिंदुस्थानातल्या संस्थानांतली प्रातिनिधिक वाटेल अशी समाज-जाती व्यवस्था, तिच्या उतरंडीतले सूक्ष्म तपशील, विविध जातींचे स्वभावगत विशेष, दरबारात – बाहेर अशा सगळीकडच्या राजकारणाचे सूक्ष्म पदर, स्वातंत्र्य-सामाजिक चळवळीतील विविध नेत्यांची प्रत्यक्षाप्रत्यक्ष दर्शने, त्यात दिसलेले जागतिक महायुद्धाच्या आगचेमागचे वैश्विक भान या पार्श्वभूमीमुळे कथेचे परिमाण व्यापक होते.

‘उच्छाद’मध्ये सद्भाव, सामंजस्य, प्रेमाच्या अभावी वैयक्तिक संबंधाचं नासत जाणं येतं. त्यातून उद्भवणाऱया कैक शरीर-मानसिक विकारांचे, त्यावरील उपचारांचे तपशील येतात तशीच प्रेमाची गरजही सतत अधोरेखित होत राहते. शेवटी श्रीधर मारियाची जीवघेणी ओढ टाळून आई असूनही एकाकी असलेल्या मुलासाठी , ‘राघव’साठी परत निघतो. त्या रात्री मारिया त्याला एक गझल ऐकवते रेकॉर्ड प्लेअरवर… ‘न मिलता गम तो अफसाने कहॉं जाते अगर होते सभी अपने तो बेगाने कहॉं जाते’ ऐकून परिस्थितीने हतबल, भणंग झालेला तरी मनस्वी श्रीधर आवेगाने म्हणतो, ‘‘मारिया, माझंही गाणं मला गाता यावं, माझीही एक वल्गना मला करता यावी असं मला सारखं वाटत आलं आहे…’’

‘बखरत्रय’ हे सरदेशमुखांना गायचं होतं ते गाणं आहे, त्यांनी केलेली वल्गना आहे.

समीक्षेतले सरदेशमुखांचे योगदानही ‘सरदेशमुखी समीक्षा’ हा शब्द रूढ व्हावा इतके भरीव आणि स्वयंभू आहे. मराठी समीक्षा व्यवहारातली कोंडी फोडून आपल्यापुरती स्वतंत्र वाट त्यांनी निर्माण केली  इतके नक्की म्हणता येते. शास्त्र्ाकाटय़ाच्या कचाटय़ात अडकलेल्या, त्यामुळे वाचकांपासून काहीशा फटकून असलेल्या समीक्षेला मोकळे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जगभरची ‘शास्त्र्ाशुद्ध’ समीक्षा मनःपूर्वक अभ्यासत तरी ‘आत्मप्रत्यय’ हा एकमेव निकष लावून त्यांनी लिहिली ती समीक्षा साहित्यकृतीच्या मर्यादा ओलांडत जीवनातील चेतनार्थाचा शोध घेते.

‘अंधारयात्रा’ या पहिल्या संग्रहात संग्रहित झालेले ‘कवितेतील नवता’ (‘सत्यकथा’ , डिसेंबर 1959) ते ‘काळोखातील एकांत ः गोविंदाग्रज’ (‘सत्यकथा’ , जानेवारी 1968) यादरम्यानच्या दशकभरातले लेखन हे त्यांचे पहिले गंभीर, महत्त्वाकांक्षी समीक्षा लेखन म्हणता येईल. प्रामुख्याने केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज आणि मर्ढेकर यांच्या संदर्भातल्या या लेखनात सरदेशमुखांनी 1885 ते 1960 या पाऊण शतकातल्या मराठी कवितेचे बृहतचित्र रेखाटले आहे. भावकविता, तिचे जन्मकारण, पोषण, आस्वाद्यता याआधारेच विवेचन असले तरी या चौघा कवींच्या कवितेत जाणवलेला काळोख हा सरदेशमुखांना महत्त्वाचा वाटतो. कवितेतले वास्तव, नवता, तिची वेधशक्ती, तिला लगटून असलेला परतत्त्वस्पर्श यासंबंधानेही आपले असे स्वतंत्र आकलन त्यांनी ‘अंधारयात्रा’मध्ये मांडले आहे. यात अध्यात्म, आत्मप्रत्यय हे मुख्यतः आधार असल्याने शास्त्र्ाशुद्धतेचा आग्रह धरणाऱयांनी यावर टीका केली. याचा कसलाही प्रतिवाद न करता सरदेशमुखांनी आपले एकूण साहित्यविषयक बृहद आकलन ‘प्रदेश साकल्या5चा’ मधून मांडले. चेतनार्थ (कॉन्शसनेस), कलाकृतीचा आकार आणि त्यातून प्रकटणारा जीवनार्थ, साहित्याच्या संदर्भात विद्रोह – आधुनिकता, साहित्यातले सामग्य्ा्राचे भान, समीक्षेचा व्यापक परीघ यासंदर्भातले तपशीलवार विवेचन जागतिक साहित्य-समीक्षेतले दाखले देत या संग्रहात त्यांनी केले आहे. या दोन्ही संग्रहांत त्यांनी जो समग्र जीवनाचीच चिकित्सा करू पाहणारा समीक्षा विचार मांडला त्याआधारे केलेले ग्रेस, नारायण सुर्वे, कुसुमाग्रज, शरश्चंद्र मुक्तिबोध, पु.शि.रेगे हे मराठी तर एमिली डिकिन्सन, ब्रेख्त, हर्मन हेसे, व्हिक्टर ह्युगो, आयनेस्को, खलिल जिब्रान, जे. कृष्णमूर्ती यांच्यावरील व्यापक परिघातले दीर्घलेखन ‘धुके आणि शिल्प’ (1985), ‘शारदीय चंद्रकळा’ (1992) आणि ‘स्फटिक दिवे’ (2000) मधून संग्रहित झाले. गडकरी आणि समर्थ रामदास यांच्यावरचे त्यांचे लेखनही या दोन्ही महानुभावांना त्यांच्या रूढ प्रतिमेतून मुक्रर करणारे आहे.

सरदेशमुखांनी थोडीच, पण लक्षवेधी भावकविताही लिहिली. त्यांचे दोन संग्रह ‘उत्तररात्र’ आणि ‘कविता चंद्रकेतूची’ प्रसिद्ध आहेत. ही प्रामुख्याने भावकविता असून एकास एक असा हृदयसंवाद करणारी आहे. विषमता, अन्याय यासंदर्भातले शोकसंवेदन याही कवितेत आहे, ‘‘नट, नाटक आणि आपण‘‘ मधून अगदी शेवटी त्यांनी आपल्या नाटय़विचाराला मूर्तरूप दिले. , त्याच्या संवादी सुरातही नाटकाने सत्याचा शोध घ्यावाच, पण त्यापाठीमागे शिवाकांक्षा, भद्राकांक्षा असावी’’ असाच आग्रह आहे.

सरदेशमुखांनी केलेले अनुवाद हा  त्यांचा अनुवादविचार आणि शैली या दोन्ही अंगांनी स्वतंत्र लेखविषय आहे. त्यांचे अनुवादही मोजकेच आहेत. हर्मन हेसेचे ‘सिद्धार्थ’ (‘नदीपार’) आणि ‘पूर्वेची यात्रा’ (‘जर्नी टु द ईस्ट’), जिब्रानचे ‘देवदूत’ (‘प्रॉफेट’), ‘देवदूताचे विहारवन’ (‘गार्डन ऑफ प्रॉफेट’) आणि ‘अग्रदूत’ (‘फोररनर’), गुस्ताव यानूशचे ‘काफ्काशी संवाद’ (‘कन्वरसेशन्स विथ काफ्का’)  आणि अगदी अलीकडे प्रकाशित आयनेस्कोचे नाटक ‘मग एकच धडकी’ (‘हाऊ टु गेट रिड ऑफ इट’) याव्यतिरिक्त काही कविता,  कथा आहेत तरी प्रचंड मोठा पैस आहे तो त्यांच्या समीक्षेत. ‘अंधारयात्रा’ आणि ‘प्रदेश साकल्याचा’ या पुस्तकांतली अशी वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या प्रज्ञावंतांची मूळ उद्धृतं आणि त्यांचे सरदेशमुखांनी आपल्या खास शैलीत दिलेले अनुवाद अभ्यासावेत असे आहेत. सुदीर्घ साक्षात्कार’ ( प्रा. निशिकांत ठकार यांनी घेतलेली त्यांची दीर्घ मुलाखत, ‘आशय’ दिवाळी अंक 2001) मध्ये ते म्हणतात, ‘‘अनुवाद करणं नेहमीच आनंददायक होतं. वैभवशाली अंतःकरणांबरोबर सहलीला निघाल्यासारखं वाटायचं. मूळ लेखक मौनात आणि आपण त्याच्याशी संवादात अशी अनोखी देवघेव अनुवादात चालते.’’ ही त्यांची अनुवादाची कल्पना किती लोभस आहे.

सरदेशमुख गेले त्याला 14 वर्षे उलटून गेली. 86 वर्षांच्या या कृतार्थ दीर्घायुष्यानंतर पिकलं पान सहज गळून पडावं इतक्या सहजतेने गेले, तरी वाटते त्यांची वाट पुस्तकांना चूड न लावताही अशीच उजळलेली असेल…

[email protected]