
बिहारच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा विराजमान होण्याच्या प्रयत्नात असलेले नितीश कुमार यांनी आज आरक्षणाबद्दल एक गंभीर वक्तव्य केले. आरक्षण हे त्या-त्या वर्गाच्या लोकसंख्येनुसारच मिळाले पाहिजे असे ते बिहारमधील एका प्रचारसभेत म्हणाले.
बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदार पार पडल्यानंतर नितीश कुमार यांची आज वाल्मिकीनगर येथे प्रचारसभा झाली. त्यात त्यांनी आरक्षणाचा मुद्दा काढला. जनगणना करणे हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते पण लोकसंख्येनुसारच आरक्षण मिळायला हवे अशी आपली इच्छा असल्याचे ते म्हणाले.
बिहारमधील निवडणुकीत जातीचे समीकरण प्रभावी ठरते असा इतिहास असल्याने नितीश कुमार यांनी हा डाव खेळला अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. देशात जातनिहाय जनगणना ही 1931 मध्ये झाली होती. स्वातंत्र्यानंतरच्या जनगणनेमध्ये फक्त एससी आणि एसटी या प्रवर्गांचे स्वतंत्र रकाने आहेत. देशातील अनेक राज्ये जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत.



























































