ठाणेकरांनी वापरली पुरेपूर लस, वाया जाण्याचे प्रमाण राज्यात सर्वात कमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लसीकरणाच्या बाबतीत ठाणे महापालिकेने जबरदस्त कामगिरी केली आहे कोविशील्ड व कोवँक्सिन या लसीच्या एकूण 3 लाख 41 हजार 950 डोसेस चा पुरेपूर वापर केला आहे. आत्तापर्यंत 3 लाख 50 हजार 528 प्रोसेस नागरिकांना देण्यात आले असून फक्त 2.51 टक्केच लस वाया गेली आहे. आरोग्य विभागाच्या चोख नियोजनामुळे लस वाया जाण्याचे राज्यातील हे सर्वात कमी प्रमाण आहे.

महापालिकेचा वतीने 55 लसीकरण केंद्राच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. 16 जानेवारी ते 20 मे पर्यंत महापालिकेच्या आरोग्य विभागास एकूण 3 लाख 41 हजार 950 डोसेस उपलब्ध करण्यात आले होते. या लसीकरणाचे योग्य प्रकारे आरोग्य विभागाने नियोजन केले. तसेच लस साठविण्यासाठी आवश्यक असलेली काळजी देखील घेतली.

आत्तापर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर 45 ते 60 वयोगट आंतर्गत 89,413 लाभार्थ्यांना पहिला तर 20,290 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 60 वर्षांवरील नागरिकांमध्ये 1,07,834 लाभार्थ्यांना पहिला डोस व 47, 397 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. एकूण सुमारे साडेतीन लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

येथे संपर्क साधा

लसीकरण संदर्भात शंका असल्यास किंवा प्रमाणपत्राबाबत काही अडचणी उद्भवल्यास दुपारी 1 ते 5 या वेळेत संपर्क साधावा. क्रमांक: 8451008325 आणि 8433796770.