
सामना प्रतिनिधी । पारनेर
येत्या 6 सप्टेबरपासून आरक्षणाच्या विरोधात आपण आंदोलन करणार असल्याच्या सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या बातमीचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरूवारी पत्रकाद्वारे इन्कार केला आहे. आरक्षणच्या संवेदनशिल मुद्यावर सामाजिक भान राखून व्यापक चर्चा व्हावी व सामोपचाराने असे प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा हजारे यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून अण्णा हजारे हे आरक्षणाच्या विरोधात आंदोलन सुरू करीत असल्याच्या बातम्या सोशल मिडीयावर व्हायलर झाल्या आहेत. यासंबंधी आपणाकडे माध्यमांकडूनही विचारणा होत आहे. आरक्षणाच्या विरोधात किंवा समर्थनार्थ आपण कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही. येत्या 6 सप्टेबर रोजी मी आरक्षणाच्या विरोधात आंदोलन करणार असल्याच्या बातम्या पुर्णतः खोट्या असून जाणीवपूर्वक पसरविण्यात येत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार समता निर्माण व्हावी या हेतून आरक्षणाची तरतूद केली आहे. समतेसाठी आरक्षण असणे आवश्यकही आहे. पण अलिकडील काळात आरक्षणाच्या मुद्यावरून वेगवेगळ्या प्रांतात जी स्थिती निर्माण झाली आहे ती पाहता या मुद्यावरून जातीय सलोखा धोक्यात येईल की काय अशी शक्यता वाटते. अशा प्रकारे एखाद्या मुद्यावरून सामाजिक अशांतता निर्माण होउन देशाचे तुकडे होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे अशा संवेदनशिल मुद्यावर सामाजिक भान राखून व्यापक चर्चा व्हावी व सामोपचाराने असे प्रश्न सोडविण्यात यावेत असे वाटते.
सध्या शेतक-यांचे प्रश्न, वाढता भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी इत्यादी महत्वाच्या मुद्यांवर केंद्र सरकारशी सातत्याने पत्रव्यवहार सुरू असून सरकारने 23 मार्च पासून दिल्लीतील रामलिला मैदानावर केलेल्या आंदोलनप्रसंगी दिलेल्या लेखी अश्वासनाचे पालन न केल्यामुळे मी येत्या 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीपासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन सुरू करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या बाबतीत कोणतेही आंदोलन करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल अशा प्रकारच्या खेटया बातम्या पसरविण्यात येउ नयेत अशी आपण विनंती करीत असल्याचे हजारे यांनी या पत्रकात नमुद केले आहे.






























































