
सामना प्रतिनिधी । अहमदपूर
अहमदपूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. मीनाक्षी विरेंद्र रेड्डी यांच्यावर पालिकेतील १९ नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.
अहमदपूर पालिकेत नगराध्यक्षा सौ.अश्विनी कासनाळे व उपनगराध्यक्ष ह्या दोन्हीही भाजपाच्या आहेत. पक्षीय बलाबल पहाता भाजपा ९, राष्ट्रवादी ९, शिवसेना २, काँग्रेस २, बहुजन विकास आघाडी १ असे पक्षीय बलाबल आहे.
गेल्या कांही दिवसापूर्वी दोन सभापती व चार विषय समिती सदस्यांनी नगराध्यक्षाचे पती स्वीकृत नगरसेवक लक्ष्मीकांत कासनाळे यांच्यावर विविध गंभीर स्वरूपाचे आरोप करून आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती.
आज नगर पालिकेत सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या सभेवर बहुतांश नगरसेवकांनी बहिष्कार टाकून थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. आज दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर भाजपा, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बहुजन विकास आघाडीच्या सदस्यांच्या स्वाक्ष-या करून उपनगराध्यक्षा सौ. मीनाक्षी विरेंद्र रेड्डी यांच्यावर अकार्यक्षमतेचा व त्यांच्या मुलाचा पालिकेत वाढता हस्तक्षेप असे आरोप केले आहेत. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून नव्याने कांही राजकीय समीकरणे तयार होत आहेत.






























































