चांगली बातमी! मुंबईत एकही नवीन रुग्ण नाही

1767
Coronavirus scare
प्रातिनिधिक फोटो

कोरोनाचा राज्यात एक रुग्ण सापडला असला तरी मुंबईत आज कोरोनाचा एकही नवीन रुग्ण सापडला नाही. कस्तुरबा रुग्णालयात आज दिवसभरात कोरोनाच्या संशयित 43 व्यक्तींच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. ते सर्वांच्या सर्व निगेटिव्ह आले. त्यामुळे धास्तावलेल्या मुंबईकरांसाठी आजचा दिवस काहीसा दिलासा देणारा ठरला आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या नऊ रुग्णांच्या तब्येतीत चांगली सुधारणा होत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने मुंबईतही शिरकाव केल्याने सध्या शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली. शनिवारी यात ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि रायगडमधील प्रत्येकी एक अशा चार रुग्णांची भर पडल्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 9 वर गेली होती. त्यामुळे मुंबईकर धास्तावले होते. पण रविवारी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांपैकी 43 संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासले असता ते निगेटिव्ह आले. कस्तुरबात आतापर्यंत 458 संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले असून त्यापैकी 380 जणांचे रक्ताचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘ओपीडी’त आतापर्यंत 1500 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही, अशी माहिती पालिकेच्या उपमुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.

कस्तुरबात 100 बेड, 24 तास चाचण्या होणार
पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयाची आतापर्यंत 80 बेडची क्षमता होती, मात्र आजपासून बेडची क्षमता वाढून 100 झाली आहे. दाखल करण्यात येणाऱया संशयित रुग्णांची संख्या 100 पेक्षा वाढली तर अशा रुग्णांना पालिकेच्या कुर्ला आणि वांद्रे येथील भाभा, राजावाडी आणि बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये बेड तयार ठेवण्यात आले आहेत. कस्तुरबाच्या लॅबची क्षमता वाढवली असून आता संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने 24 तास तपासले जाणार आहेत.

‘केईएम’ची लॅब 4 दिवसांत सुरू होणार
पालिकेच्या ‘केईएम’ रुग्णालयातही कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे. येत्या चार दिवसांत केईएममधील लॅब सुरू होणार आहे, अशी माहिती डॉ. शहा यांनी दिली. या ठिकाणी पालिकेची रुग्णवाहिका तैनात असणार आहे.

रविवारी 10 हजार सोसायटय़ांमध्ये तपासणी
कोरोनाची जनजागृती आणि तपासणी करण्यासाठी पालिकेने कंबर कसली असून आज रविवार असतानाही पालिकेच्या 1067 जणांच्या टीमने मुंबईतील 24 विभागांत जाऊन 10 हजार सोसायटय़ांमधील लोकांची तपासणी केली. यात डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल कर्मचाऱयांचाही समावेश होता. तपासणीबरोबर कोरोनाबद्दल जनजागृतीही करण्यात आली, पोस्टर वाटण्यात आली.

कोरोनाची थेट लागण परदेशवारीमुळेच
कस्तुरबात आढळलेल्या नऊ रुग्णांपैकी आठ जणांना परदेशीवारीत कोरोनाची लागण झाली आहे तर केवळ एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग त्याच्या जवळच्या नातेवाईकामुळे झाला आहे. कोरोनाची थेट लागण जवळच्या व्यक्तींना होण्याचे प्रमाण हे खूपच कमी आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये. योग्य ती काळजी घ्यावी, योग्य झोप, आहार घ्यावा. स्वच्छता पाळावी. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराला आळा बसेल, असे डॉ. शहा यांनी सांगितले.

अशी काळजी घ्यावी
परदेशातून येणारी व्यक्ती व त्यांचे निकट असलेल्या व्यक्ती अशा दोन प्रकारातून सध्या हिंदुस्थानमध्ये कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे जे परदेशातून प्रवास करून मुंबईत आले आहेत त्यांनी व त्यांच्या निकटच्या व्यक्तींनी घरातच 14 दिवस वेगळे थांबावे. मधुमेह, रक्तदाब तसेच गरोदर महिलांपासून लांब राहावे. 14 दिवसांत किंवा नंतर सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ कस्तुरबा रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे डॉ. शहा यांनी सांगितले.

19 ते 31 मार्चपर्यंत बॉलीवूड बंद
कोरोना व्हायरचा धसका मनोरंजनसृष्टीने देखील घेतला आहे. 19 मार्च ते 31 मार्चपर्यंत शूटिंग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. रविवारी इंडियन मोशन पिक्चर्स असोशिएशन (इम्पा), फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉईज, इंडियन फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोशिएशन यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. निर्मात्यांचे नुकसान टाळण्यासाठी पुढील तीन दिवसांत चित्रीकरण संपविण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. 30 मार्चला पुन्हा बैठक घेऊन परिस्थिती पाहून शूटिंगबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असे इम्पाचे अध्यक्ष टी.पी.अग्रवाल यांनी सांगितले.

गिरगावातील शोभायात्रा रद्द
डोंबिवली, ठाणे येथील गुढीपाडव्याच्या शोभायात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ आता गिरगावकरांनीही शोभायात्रा न काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेत 31 मार्चपर्यंत बायोमेट्रिक हजेरी बंद
कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये आणि त्याला प्रतिबंध करता यावा, यासाठी मुंबई महानगरपालिकेने 31 मार्चपर्यंत कर्मचाऱयांची बायोमेट्रिक हजेरी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बायोमेट्रिकऐवजी कर्मचारी आता नोंदवहीत हजेरी लावणार आहेत.

पालिकेचे ‘ट्विटर’अकाऊंट, संकेतस्थळ!
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर माहितीचा महापूर आला आहे, मात्र यात अफवाच मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून घबराट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर, पालिकेने आपले ट्विटर अकाऊंट आणि संकेतस्थळ सुरू केले असून माहितीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी लोकांनी twitter.com/mybmc आणि StopCoronavirus.MCGM.gov.in याला भेट द्यावी आणि गैरसमज दूर करावे, घाबरू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या