
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबईकरांचा डबा उद्या मंगळवारी बंद राहणार आहे. घडय़ाळाच्या काटय़ावर लोकलच्या वेगाने धावून मुंबईकरांना वेळेत डबा पोहचवणारे डबेवाले आज कार्तिकी उत्पत्ती एकादशीनिमित्त ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला गेले आहेत. एकादशी उपवास उद्या सकाळी बारसनिमित्त आळंदीत सोडल्यानंतर ते परत मुंबईला रवाना होणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी सहकार्य करावे असे आवाहन डबेवाल्यांनी केले आहे.
मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाच्या माध्यमातून पाच हजारांहून अधिक डबेवाले दररोज लाखो मुंबईकरांना डबा पोहचवतात. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता इमानेइतबारे त्यांचे काम सुरू असते. मात्र आज दिवसभराचे आपले काम आटोपून सर्व डबेवाले माऊलींच्या दर्शनासाठी गेले आहेत. त्यामुळेच उद्या डबे पोहचवण्याची सेवा बंद राहणार असल्याचे मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे उपाध्यक्ष साबाजी मेदगे यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारपासून नियमितपणे डबे पोचवण्याची सेवा सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


























































