
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर सोन्यामध्ये तुफानी तेजी दिसून आली. सोन्यामध्ये अद्यापही तेजी असून आता सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोन्याला सोन्याचे दिवस आले असले तरी सोन्याच्या वाढत्या दरामुळे अमेरिकेची झोप उडाली आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकांची सोन्याची जबरदस्त खरेदी होत असल्याने अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे. या वाढत्या खरेदीमुळे डॉलरचे अवमूल्यन होत त्यात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोन्याचे भाव गगनाला भिडत आहेत आणि दररोज एक नवा विक्रम करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपासून ते देशाच्या स्थानिक बाजारपेठेपर्यंत सोने आवाक्याबाहेर जात आहे. तसेच जगभरातील मध्यवर्ती बँका सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवत आहेत. चीनपासून ते हिंदुस्थानच्या रिझर्व्ह बँकेपर्यंत सोन्याच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे. ही खरेदी अमेरिकेसाठी एक मोठा धक्का आहे आणि गेल्या 30 वर्षांत पहिल्यांदाच जागतिक मध्यवर्ती बँकेच्या साठ्यात सोन्याने अमेरिकेच्या तिजोरीपेक्षा जास्त वाढ केली आहे.
जागतिक आर्थिक परिस्थिती बदलत आहे आणि ट्रम्पच्या टॅरिफ धोरणांमुळे अशांतता आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. जगातील मध्यवर्ती बँकांनी आता सोन्याच्या खरेदीला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणातील खरेदीमुळे त्यांच्या तिजोरीत सोन्याचा साठी सातत्याने वाढत आहे. वाढत्या मागणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती प्रति औंस $३,५९२ या सर्वकालीन उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. केवळ २०२५ मध्येच त्यात 36% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
बँकांकडून सोन्याच्या खरेदीत झालेली वाढ अमेरिकेसाठी एक मोठा धक्का ठरली आहे आणि जवळजवळ ३० वर्षांत पहिल्यांदाच, जागतिक मध्यवर्ती बँकेच्या साठ्यात सोन्याने अमेरिकन तिजोरीला मागे टाकले आहे. अहवालांनुसार, सोने आता मध्यवर्ती बँकांच्या परकीय चलन साठ्यात २०% झाले आहे, ज्यामुळे युरोचा १६% वाटा मागे पडला आहे. इतकेच नाही तर १९९६ नंतर पहिल्यांदाच ते अमेरिकन ट्रेझरीलाही मागे टाकले आहे.
२०२२ ते गेल्या वर्षी २०२४ पर्यंत, केंद्रीय बँका दरवर्षी १,००० टनांपेक्षा जास्त सोने खरेदी करत आहेत, जे २०२० पूर्वीच्या सरासरीपेक्षा दुप्पट आहे. पूर्वी, हा आकडा १०० टनांच्या आसपास होता. युरोपियन सेंट्रल बँकेच्या अहवालानुसार, आता ३६,००० टनांपेक्षा जास्त सोने मध्यवर्ती बँकांकडे आहे. तर चीन आपल्या परकीय चलन साठ्यात विविधता आणण्यासाठी आणि डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सोने खरेदी करत आहे आणि त्याच्या एकूण साठ्यात सोन्याचा वाटा सुमारे ७ टक्के आहे. त्याच वेळी, आरबीआयच्या परकीय चलन साठ्यात सोन्याचा वाटा १० टक्क्यांहून अधिक वाढला आहे, जो २०२१ मध्ये सुमारे ५ टक्क्यांपर्यंत होता. यावरून मध्यवर्ती बँका सोन्याची खरेदी सतत वाढवत आहेत याची कल्पना येते.
मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची ही वाढती खरेदी मागे एक नाही तर अनेक कारणे आहेत. इस्रायल-हमासपासून ते रशिया-युक्रेनमधील युद्धापर्यंत, सोन्याच्या जागतिक खरेदीत अमेरिकेच्या निर्बंधांची चिंता मोठी भूमिका बजावते. याशिवाय, अमेरिकेचा सतत वाढणारा कर्जाचा बोजा (३७ ट्रिलियन डॉलर्स – ऑगस्ट २०२५ पर्यंत) आणि डॉलरमध्ये सतत घसरण ही देखील कारणे आहेत. जे २०२५ मध्ये आतापर्यंत १० टक्क्यांहून अधिक घसरले आहे. जागतिक राखीव निधीमध्ये ४६% चा मोठा वाटा असलेल्या डॉलरच्या किमतीत झालेली घट, त्यावरील विश्वास कमी झाल्याचे दर्शवते आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी वाढत आहे.