लालबाग, परळमध्ये गणेशभक्तांना ‘नो एण्ट्री’; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत काळाचौकी, लालबाग आणि परळ याठिकाणी अनेक नामांकित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने गर्दी केली जाते. यंदा मात्र कोरोनामुळे भाविकांनी प्रत्यक्ष मंडपात जाऊन दर्शन न घेता फक्त ऑनलाइन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे स्पष्ट आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे उत्सव कालावधीत लालबाग परळमध्ये राज्यातून येणाऱया भक्तांना याठिकाणी ‘नो एण्ट्री’ असणार आहे.

मुंबईतील लालबाग, परळ आणि काळाचौकी या ठिकाणी मोठय़ा उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. आर्कषक देखावा, उंच गणेशमूर्ती आणि इतर अनेक कारणांसाठी येथील अनेक नामांकित मंडळाच्या गणपतींना देशभरातूनच नव्हे तर जगभरातून भक्तगण दर्शनाला येत असतात. त्यात प्रामुख्याने लालबागचा राजा, गणेशगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, रंगारी बदक सार्वजनिक उत्सव मंडळ, काळाचौकीचा महागणपती, तेजुकायचा राजा, नरेपार्कचा राजा यासारख्या अनेक मंडळांचा यात समावेश असून या मंडळांच्या गणपतीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भक्तगण दर्शनाला येत असतात.

मुखदर्शन असो किंवा प्रत्यक्ष नवसाच्या रांगेतून दिवसाला दर्शन घेणाऱया भक्तांची संख्या लाखांवर असते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा याठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने आपले सर्वस्व पणाला लावले आहे. प्रामुख्याने लालबागचा राजाच्या दर्शनासाठी मोठय़ा संख्येने गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुंबई पोलिसांच्या एका पथकाने नुकताच येथील तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी याठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी या संपूर्ण विभागातील गणेशोत्सव मंडळासाठी फक्त ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्याची सूचना दिली असल्याची माहिती पुढे आली आहे.

यासाठी मंडळांनी युटय़ूब, फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमांचा वापर करण्याची सूचना मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्सव कालावधीत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचनाही यावेळी देण्यात आली आहे.

आरती आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्यावेळी ही गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना यावेळी करण्यात आल्याचे कळते.

मंडळांमध्ये नाराजी

मुंबई पोलिसांच्या या निर्णयामुळे लालबाग, परळ आणि आसपासच्या परिसरातील मंडळांमध्ये नाराजी पसरल्याची माहिती कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे. काही मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवासाठी मूखदर्शनाची मागणी लावून धरली होती. मात्र आता पोलिसांच्या आक्रमक भूमिकेमुळे मंडळे कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.